प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
सिन्नर तालुका व शहरात गुरुवारी संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने कधी नव्हे ते सिन्नरमधील सरस्वती नदीला पूर आला. पुराचे पाणी थेट सिन्नरच्या बाजारपेठेत घुसले. त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी बाजारपेठेतील दुकानातच थांबण्याचे ठरवले. पण पाणी पातळीत वाढ होत असल्याने रात्री उशिरा दुकानांमध्ये पाणी शिरले. सिन्नर जवळील ढग्या डोंगर परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आणि नद्यांनी पुररेषा ओलांडल्याचं चित्र आहे.
थोड्या विश्रांतीनंतर सिन्नरमध्ये पुन्हा पाऊस
गेल्या दोन महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर आला होता. त्यामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसून मोठे नुकसान झाले होते. मात्र मधल्या काळात पावसाने विश्रांती घेतली होती. नंतर 31 ऑगस्टपासून नाशिक जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनने विजेच्या कडकडाटासह आगमन केले. परवा शिर्डीत बरसल्यावर काल नाशिकच्या पूर्व भागातील सिन्नर तालुका व शहरात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. हा पाऊस दुपारनंतरही कोसळत होता. पण संध्याकाळनंतर मात्र मुसळधार पावसाने सिन्नर तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे परिसरातील नद्यांना पूर आले आणि घरात व दुकानात पाणी शिरले.
पुरात अडकलेल्या 33 जणांचं रेस्क्यू
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 33 लोक पुरात अडकले होते. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व महसूल कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री उशिरा पुराच्या पाण्यात व दुकानात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढले. दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नरला अवघ्या काही तासात झालेल्या मुसळधार पावसाने सिन्नरला जोडणारे 3 रस्ते पाण्याखाली गेले. देव नदीलाही पूर आला. तर सिन्नर कुंदेवाडी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
परिसरातील शेतीचं नुकसान
सिन्नर स्मशानभूमी जवळील पूल एका बाजूने वाहून गेल्याने तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यात काही गाड्याही वाहून गेल्या आहेत. मात्र याबाबत सविस्तर माहिती पंचनाम्यानंतर मिळेल. मोठ्याप्रमाणात आलेल्या पावसामुळे आजूबाजूच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नुकतंच खरिपाची पेरणी करण्यात आली होती. त्यासाठी उगवलेल्या पिकांना पाण्याची गरज होती. मात्र अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झालं आहे.
ADVERTISEMENT