राज्याचे उच्च व तंत्रशिक्षम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाने वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. दरम्यान, त्यांच्यावर शाई फेक करण्यात आल्यानं प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत असून, शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून कामाख्या देवीचं दर्शन, तंत्र, मंत्र, करणीचा उल्लेख करत शिंदे गटाच्या दिशेनं अंगुली निर्देश केलाय.
ADVERTISEMENT
सामना अग्रलेखात शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात कटुतेचा स्फोट झाला आहे व या वातावरणास भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. महाराष्ट्रातले वातावरण इतके गढूळ आणि विषारी कधीच झाले नव्हते. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे शाईफेक करण्यात आली. अशा घटनांचे समर्थन करता येणार नाही, पण शेवटी जे पेरले तेच उगवताना दिसत आहे.”
शिंदे गटाने कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर भाजप नेत्यांवर करणी केली? अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
“मिंधे गटाचे आमदार गुवाहाटी येथे कामाख्या देवीची वेगळ्या पद्धतीने पूजाअर्चा करून आले. तेथे तंत्र, मंत्र, करणी वगैरे प्रकार केले जात असल्याची वदंता आहे. मिंधे गटाच्या लोकांनी मंदिरात जाऊन नक्की काय केले ते त्यांनाच माहीत, पण तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजप मंत्री व पुढाऱ्यांची डोकी साफ भरकटून गेली आहेत. ते वेड्यासारखे बरळू लागले आहेत. मिंधे गटाने नक्की कोणाच्या विरोधात जारण-मारण केले असा प्रश्न त्यामुळे महाराष्ट्राला पडला आहे”, असं म्हणत शिवसेनेनं वेगळीच शंका उपस्थित केलीये.
चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : कलम वाचून राजू शेट्टी संतापले; सरकारची तालिबानशी तुलना
‘चंद्रकांत पाटलांना भिकेचे डोहाळे लागलेत’, शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) टोला
चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाचा सामना अग्रलेखातून समाचार घेण्यात आलाय. “भारतीय जनता पक्षाचे नेते इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट व शाप त्यांना लागलेत का? नपेक्षा शिकल्या-सवरलेल्या माणसांच्या डोक्यावर असा परिणाम झालाच नसता. चंद्रकांत पाटील हे तर राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. शिक्षणमंत्री म्हणून त्यांना भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे. पाटील यांच्या विधानाचे पडसाद बहुजन समाजात उमटू लागले आहेत. ते पिंपरीतील घटनेवरून दिसले”, अशी टीका चंद्रकांत पाटलांवर शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केलीये.
Chandrakant Patil: ‘अरे नाना पटोल्या…’, मंत्री चंद्रकांत पाटलांचा तोल ढळला
महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा ‘जिहाद’ -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
“मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता दिलगिरी व्यक्त करून माघार घेतली. तरीही शाईफेकीचा हल्ला त्यांच्यावर झाला. महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा ‘जिहाद’ सरकारने पुकारला आहे काय? ‘लव्ह जिहाद’विरुद्ध कायदा महाराष्ट्र सरकार बनवत आहे. त्याआधी शिवराय, फुले, आंबेडकरांच्या विरोधात वळवळणाऱ्या जिभांना आवर घालणारा कायदा करा”, अशी भूमिका अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मांडली आहे.
ADVERTISEMENT