पत्रा चाळ प्रकरणात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांना ताब्यात घेऊन दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. सकाळी सात वाजता संजय राऊतांच्या घरी पोहोचलेल्या ईडीच्या पथकाने ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. याच प्रकरणात आज सकाळी ईडीचं पथक शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल झालं. सकाळी ७ वाजेपासून ईडीच्या पथकाकडून संजय राऊतांची चौकशी सुरू होती.
ईडीचं पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली होती. त्याच दिशेने आता घडामोडी संजय राऊत यांच्या घरात घडताना दिसत आहे.
संजय राऊतांना अटक होण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील शिवसैनिकांना काय सांगितलं?
सकाळी ७ वाजेपासून संजय राऊत यांच्या घरात तळ ठोकून असलेल्या ईडीच्या पथकाने ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांना आता ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.
संजय राऊत यांना त्यांच्या राहत्या घरातून ईडी कार्यालयात घेऊन जाण्यासाठी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. संजय राऊतांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर ईडी कार्यालयाच्या बाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
संजय राऊत यांच्यामागे ज्यामुळे ईडीचा फेरा लागला, ते पत्रा चाळ प्रकरण काय?
संजय राऊत प्रकरणातील अपडेट बघण्यासाठी इथे क्लिक करा
दोन समन्सनंतर संजय राऊतांना घेतलं ताब्यात
पत्रा चाळ प्रकरणात ईडीने यापूर्वीच संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणलेली आहे. संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील जमीन ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर संजय राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. १ जुलै रोजी संजय राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर २० जुलै रोजी संजय राऊत यांना ईडीकडून दुसरं समन्स पाठवण्यात आलं. मात्र, संजय राऊत उपस्थित राहिले नाही.
त्यानंतर २७ जुलै रोजी संजय राऊत यांना दुसरं समन्स पाठवण्यात आलं. मात्र, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं उपस्थित राहू शकत नाही. ७ ऑगस्टनंतर चौकशीला हजर राहू शकेन असं संजय राऊत यांनी ईडीला वकिलांमार्फत कळवलं होतं. मात्र, आज ईडीने कारवाई करत राऊतांना ताब्यात घेतलं.
ADVERTISEMENT