गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. दिल्ली महापालिकेचे निकालही लागले. तीन ठिकाणी सत्तेत असलेल्या भाजपला एका ठिकाणीच घवघवीत यश मिळालं. हिमाचल प्रदेशात भाजपचं सरकार गेलं. दिल्ली महापालिकेतही हेच घडलं. या निवडणूक निकालांचं खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून विश्लेषण केलंय.
ADVERTISEMENT
संजय राऊत म्हणतात,”मोदींनी गुजरात जिंकले. या विजयावरच आता चर्चा सुरू आहे. भारतवर्ष एकत्र राहावे म्हणून ‘भारत जोडो’ यात्रेवर राहुल गांधी आहेत. त्याच वेळी देशातील दोन राज्यांच्या विधानसभा व दिल्ली महानगरपालिकेचे निकाल लागले. गुजरात सोडले तर दोन ठिकाणी भाजपचा मोठा पराभव झाला. भाजपने गुजरात जिंकले त्यात नवल ते काय?”
मोदी-शाहांची जादू दिल्ली, हिमाचल प्रदेशात चालली नाही -संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, “भाजपने राजधानी दिल्लीतील 15 वर्षांची सत्ता गमावली. दिल्ली महानगरपालिकेत भाजप पराभूत झाली. देशाच्या राजधानीतला हा पराभव. त्याच वेळी भाजपची सत्ता असलेले हिमाचल प्रदेश गमावले. काँग्रेसने येथे पूर्ण बहुमत मिळवून भाजपची सत्ता खेचून घेतली. म्हणजे तीन सामन्यांत भाजप फक्त एके ठिकाणी, गुजरातमध्येच जिंकला. अन्य दोन ठिकाणी ते पराभूत झाले. मोदी-शहांची जादू आपल्या गृहराज्यात चालली, पण प्रत्यक्ष दिल्लीत व हिमाचल प्रदेशात चालली नाही.”
मध्य प्रदेश-कर्नाटकात काँग्रेस सहज जिंकेल, संजय राऊतांनी केलं भाकित
“मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातेत भाजपास घवघवीत यश मिळाले. मोदी हे मोठे नेते आहेत व आता ते जागतिक ‘जी 20’ गटाचे अध्यक्ष झाल्याचा प्रचार गुजरात निवडणुकीत झाला. पण हे घवघवीत यश हिमाचल व दिल्लीत का मिळाले नाही? याचा विचार विरोधकांनी एकत्र येऊन करायला हवा. उद्या निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, कर्नाटक ही दोन्ही राज्ये काँग्रेस सहज जिंकेल”, असं भाकित संजय राऊतांनी केलं आहे.
“महाराष्ट्र तर भाजपने गमावला आहे. प. बंगाल, पंजाबात मोदी नाहीत. बिहारचे चित्र वेगळे दिसेल. लालू यादव हे किडनी बदलानंतर बरे होऊन सक्रिय होतील. फक्त उत्तर प्रदेश व गुजरात या दोन राज्यांवर भाजप भरवसा ठेवू शकेल. पण विरोधक एकत्र झाले तर या दोन राज्यांचाही फार प्रकाश पडणार नाही. झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड ही राज्ये लहान असली तरी बदल घडवू शकतील”, असं संजय राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.
2024 च्या निवडणुका राम मंदिर आणि समान नागरी कायदा मुद्द्यावर?
2024 लोकसभा निवडणूक राम मंदिर आणि समान नागरी कायद्यावर होतील, असं भाष्य संजय राऊतांनी केलंय. “2024 साली राममंदिर पूर्ण होईल व तो मुद्दा प्रचारात येईल. पुन्हा समान नागरी कायद्याचे शंख फुंकायला सुरुवात झाली आहेच”, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
“कर्नाटक विधानसभा जिंकायच्या म्हणून सीमावादाने उग्र रूप धारण केले आहे. महाराष्ट्र तोडण्याचे षड्यंत्र रचून केंद्र कर्नाटकास फूस लावत आहे. शेवटी निवडणुका जिंकण्यासाठी जनतेचे, राष्ट्राचे नव्हे तर हेच विषय समोर आणले जातात. गुजरातेत वेगळे काय झाले? काँग्रेस आपला अपमान व अवहेलना करीत असल्याचे मोदी बोलत राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी येई. गुजराती लोक त्या पाण्यात विरघळून गेले. मोरबीच्या दुर्घटनेचा आक्रोश त्यात वाहून गेला. अशा वेळी पंतप्रधान मोदी नेहमीच जिंकतात! तसेच ते या वेळीही गुजरातेत जिंकले”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
संजय राऊतांचं जे.पी. नड्डांच्या वर्मावर बोट
“शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपवून टाकू, अशी भाषा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली. पण त्यांचे स्वतःचे राज्य ‘हिमाचल’ येथेच भाजपचा दारुण पराभव झाला. लोकांना गृहीत धरू नका, हा धडा महत्त्वाचा”, असं म्हणत राऊतांनी नड्डा यांच्या पराभवाच्या वर्मावर बोट ठेवलं.
ADVERTISEMENT