औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाठ यांच्याविरोधात केटरिंग चालकाला धमकविल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय शिरसाठ आणि सिद्धांत शिरसाठ यांच्या वाढदिवसात केलेल्या केटरिंगच्या कामाचे पैसे मागितले म्हणून हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा सिद्धांत शिरसाठ यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची एक कथित ऑडिओ क्लिपही सध्या व्हायरल होतं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय आहे प्रकरण?
पोलीस स्थानकातील तक्रारीनुसार, त्रिशरण सत्यभान गायकवाड हे औरंगाबादमधील मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर येथे राहतात. अनेक वर्षांपासून त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. २०१७ मध्ये आमदार संजय शिरसाठ यांच्या वाढदिवस कार्यक्रात जेवण करण्यासाठी गायकवाड यांना ऑर्डर दिली होती, त्यानंतर त्यांचा मुलगा आणि तत्कालिन नगरसेवक सिद्धांत शिरसाठ यांच्या वाढदिवस कार्यक्रमातही जेवणाची ऑर्डर गायकवाड यांनाच देण्यात आली होती.
गायकवाड यांनी दोन्ही काम व्यवस्थित पूर्ण केली. दोन्ही कामांचे जवळपास साडेचार लाख रुपये बिल झाले होते. परंतु दोन्ही पिता-पुत्रांनी पदाचा गैरवापर करत दबाव टाकून संंबंधित रकमेतील ७५ हजार रुपये माफ करायला भाग पाडले. त्यानंतर उर्वरित पैसे देण्यासाठी त्यांनी जवळपास चार-पाच वर्षाचा कालावधी लावला. अनेक वेळा शिरसाठ यांच्या ऑफिसला चकरा मारत आणि फोन करत राहिले, विनंती करत राहिले तरी सुद्धा पैसे मिळत नव्हते, असा आरोप सदर तक्रारीत करण्यात आला आहे.
पुढे अनेक दिवस पैसे मागण्याचा तगादा लावल्यानंतर शिरसाठ यांनी थोडे थोडे पैसे दिले. आता १७ डिसेंबर रोजी दुपारी ५.०० वाजता उर्वरित २० हजार रुपये मागण्यासाठी सिद्धांत शिरसाठ यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी ऑफिसवर आलास तर तुझे हात-पाय तोडून टाकीन, तू कुठे आहेस, थांब मी तुझ्या घरी येतो अशा पद्धतीने धमकी दिली आणि त्रिशरण गायकवाड यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे. दोघांमधील संभाषणाची एक कथित ऑडिओही क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, यामुळे त्रिशरण गायकवाड आणि त्यांचे कुटुंब भयभीत वातावरणात असून तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावं. तसंच त्यांचे ९५ हजार रुपये परत करून संजय शिरसाठ यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटकही करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT