राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, एकमेकांचे वैचारिक विरोधक असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत आहे. परंतू स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मात्र या महाविकास आघाडीची बीज रोवली जाताना दिसत नाहीये. साताऱ्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादात एक वेगळंच नाट्य पहायला मिळालं.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदेंना शह देण्यासाठी खटाव-कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेंश शिंदे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना होर्डिंगवर स्थान दिलं आहे.
जाणून घ्या, काय आहे वाद?
साता जिल्ह्यातील खटाव हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील लोकांसाठी महत्वाची मानली जाणारी जिहे-कठापूर पाणी योजना ही गेली २६ वर्ष रखडली होती. या योजनेचं काम अत्यंत धीम्या गतीने सुरु होतं. परंतू २६ वर्षांनी या योजनानुसार नेर तलावात पाणी आल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ही पाणी योजना अत्यंत महत्वाची मानली जाते.
उद्घाटनासाठी शह-काटशहचा खेळ –
खटाव भागात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचं वर्चस्व मानलं जातं. शशिकांत शिंदे स्वतः जलसंपदा मंत्री असतानाही ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. परंतू नेर तलावात पाणी आल्यानंतर वाढदिवसाचा मुहुर्त साधून शशिकांत शिंदेनी योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला.
काँग्रेस राजवटीत आंदोलन करणाऱ्यांनो कोणत्या बिळात लपलात? वाढत्या इंधन दरांवरुन सेनेचा भाजपला चिमटा
सेना आमदार महेश शिंदेंनी पहाटेच केलं जलपूजन –
परंतू २०१९ विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदेंचा पराभव करणारे शिवसेना आमदार महेश शिंदेंनी भल्या पहाटे या भागात जलपूजन करत योजनेचं उद्घाटन केलं. शशिकांत शिंदेच्या वाढदिवशी होणारा कार्यक्रम व्हायच्या आधीच आमदार महेश शिंदेनी या योजनाचं उद्घाटन केल्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांपासून शिवसेना पक्ष भाजपवर वारंवार टीका करत असला तरीही राष्ट्रवादीला शह देण्यासाठी आमदार शिंदेंनी आपल्या होर्डिंगवर थेट नरेंद्र मोदींनाच स्थान दिलं आहे.
आमदार शिंदेंनी भल्यापहाटे केलेल्या या उद्घाटन आणि जलपूजन सोहळ्याला त्यांचे काही कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये वाद झाल्याची अनेक उदाहरणं आतापर्यंत समोर आली आहेत. पुणे जिल्ह्यात शिरुर, ठाणे मध्ये शिवसेना-राष्ट्रवादीचा सामना झालेला असताना आता साताऱ्यातही या वादाचा नवा अंक पहायला मिळतो आहे. यावर राजकीय क्षेत्रातून काय प्रतिक्रीया उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT