– नितीश शिंदे, पंढरपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
राज्यात नुकतीच सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांची रणधुमाळी पार पडली. महाराष्ट्रात साखर कारखान्याच्या माध्यमातून गावागावांत रुजलेलं राजकारण हा मोठा अभ्यासाचा विषय असतो. परंतू साखर कारखान्याच्या निवडणुका लढताना नेते मंडळी कशा मार्गांचा वापर करतात याचा पाढाच शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी वाचून दाखवला आहे.
सांगोला सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सभासदांना पैसे वाटून, पार्ट्या देऊन लढवल्याची जाहीर कबूली आमदार पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे आणि शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील हे सांगोला सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन होते. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दिवंगत आमदार गणपतराव देशमुखांकडे माझे काही संचालक घ्या असा प्रस्ताव ठेवला होता. परंतू त्यावेळी गणपतरावांनी वेळ निघून गेल्याचं सांगितलं. यानंतर निवडणुकीसाठी कायकाय केलं याचा पाढाच शहाजीबापू पाटलांनी वाचून दाखवला.
कमी प्रतीचा गांजा मारल्यामुळेच या कल्पना सुचतात ! ‘सामना’ मधून सेनेची फडणवीस-पाटलांवर बोचरी टीका
दिल्ली, हरियाणा, लुधियाना यासारख्या भागांत सभासदांना विमानाने फिरवून आणलं. इतकच नव्हे तर सभासदांना तीन हजार रुपये वाटले. निवडणुकीदरम्यान १७०० सभासदांना कोल्हापुरात ठेवले. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय, पत्ते खेळण्यासाठी लागणारे पैसेही दिले. याव्यतिरीक्त मटण-मासे पार्टीही झाली. मी देखील त्या पापात सहभागी होतो फक्त खिसे बारके-मोठे होते असा गौप्यस्फोट शहाजीबापूंनी केला आहे. सांगोला सहकारी कारखान्याच्या अवस्थेला मी काही प्रमाणात जबाबदार असल्याचं सांगत त्यांनी शेतकऱ्यांची माफीही मागितली.
नुकताच हा कारखाना डिव्हीपी ग्रुपचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी 25 वर्षाच्या भाडेकरारावर चालवायला घेतला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मोळीपूजन कार्यक्रमात झाला त्यात ते बोलत होते. 12 वर्षांपासून बंद पडलेला कारखाना अभिजित पाटील यांनी अवघ्या दीड महिन्यात सुरु केला. कारखान्याचा प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. यावेळी बोलत असताना शहाजीबापू पाटलांनी कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिस्सका दाखवला हे सांगताना त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीत आपण कशी लढवली हे सांगितले. कारखान्याच्या दुरावस्थेला माझ्या सह सर्वच नेते जबाबदार आहेत अशी जाहीर कबुली दिली.
कारखाना उभारणीमध्ये कोणी कोणी कसा गैर कारभार केला याची उदाहणे देत, कारखान्याच्या दुरावस्थेला आम्ही जबाबदार असल्याचेही मान्य केले. मी जर जास्त बोललो तर जास्त अडकत जाईन असंही शहाजीबापू पाटील मिश्कीलपणे म्हणाले. यानिमीत्ताने राज्यातील सहकारी साखर कारखान्यात चालणार्या गैर प्रकाराचे जळजळीत सत्य समोर आले आहे.
ADVERTISEMENT