पंढरपूर: मुलगा होत नसल्याच्या कारणाने स्वतःच्या पत्नीसह तीन मुलींना घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डांबून ठेवलेल्या पीडित विवाहित महिलेसह दोन मुलींची निर्भया पथकाकडून तात्काळ सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी पतीच्या विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मुलगा होत नाही म्हणून आरोपी पतीने पंढरपूर शहरातील झेंडे गल्लीतील एका घरात दीड वर्षापूर्वी पत्नीसह तीन मुलींना डांबून ठेवल्याचं आता समोर आलं आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आपल्या जबाबात असं म्हटलं आहे की, ‘पतीने माझा आणि माझ्या मुलींचा प्रचंड शारिरीक व मानसिक छळ केला.’ असा धक्कादायक जबाब महिलेने पोलिसांनाही दिला आहे.
या घटनेची निर्भया पथकाला माहिती मिळाली असता उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने कारवाई करत पीडित महिलेसह तिच्या तीन मुलीची सुटका केली आहे.
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, किचनमध्ये पुरला मृतदेह; मुलीच्या जबाबामुळे उघडकीस आला गुन्हा
पाहा पोलिसांनी नेमकी या घटनेबद्दल काय माहिती दिली:
‘दुपारी एक वाजेच्या सुमारास आम्हाला फोन आला आणि अशी माहिती मिळाली की, एका महिलेला डांबून ठेवलं आहे एक-दीड वर्षापासून आणि तिच्या तीन मुली आहेत त्यांना देखील बाहेर येऊ दिलं जात नाही, त्यांचे हात-पाय बांधून त्यांची मारहाण केली जात आहे. अशी तक्रार आमच्याकडे आली होती. या तक्रारीची आम्ही आमच्या वरिष्ठांना तात्काळ कल्पना दिली.’
‘याची माहिती दिल्यानंतर त्यांनी आम्हाला तात्काळ घटना नेमकी काय आहे ते जाणून घेण्यास सांगितलं. त्यानंतर साध्या वेशात जाऊन आम्ही याबाबत नेमकी माहिती घेतली. त्या ठिकाणी आम्ही गेलो असता दरवाजा आतून लावलेला होता. आम्ही जेव्हा दरवाजा ठोठावला तेव्हा आतून एक इसम बाहेर आला.’
‘तेव्हा आम्ही त्याच्याकडे चौकशी केली की, इथे अजून कोण-कोण राहतं तेव्हा तो म्हणाला की, त्याने तेव्हा सांगितलं की, एक महिला, तीन मुली आणि आई राहत असल्याचं सांगितलं.’
‘यावेळी आम्ही घरात गेलो तेव्हा एका बंद खोलीत एक महिला कोपऱ्यात बसल्याचं आढळून आलं. ती आम्हाला पाहून थोडी घाबरली. आम्ही तिला विश्वासात घेतलं. आमच्या निर्भयाच्या टीममधील महिला अधिकाऱ्यांनी पीडितेला विश्वास दिला. त्यावेळेस तिने आम्हाला सांगितलं की, गेल्या दीड वर्षापासून मला घराच्या बाहेर जाऊ दिलं नाही. पतीने दीड वर्षापासून डांबून ठेवलं आणि अनेक अत्याचार केले. अशी माहिती दिली. यानंतर आम्ही तात्काळ महिलेची आणि तिच्या मुलींची तिथून सुटका केली.’ अशी माहिती निर्भया पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर फुले यांनी दिली.
सोलापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, पतीचा खळबजनक आरोप
दरम्यान, या घटनेने संपूर्ण पंढरपूरमध्ये खळबळ माजली आहे. तसंच आरोपी पतीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे.
ADVERTISEMENT