थ्री व्हिलरचं सरकार व्यवस्थित जोरात सुरू आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. पुण्यात राज्यातल्या पहिल्या इंधन परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे उद्घाटन केलं. त्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी आज प्रश्न विचारला की राज्यात सध्या पॉलिटिकल प्रदूषण वाढलं आहे त्याबद्दल काय सांगाल? त्यावर आदित्य ठाकरे हसले आणि म्हणाले थ्री व्हिलरचं चांगलं चाललं आहे. एका ओळीत उत्तर देऊन आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोलाही लगावला आणि कोणत्याही प्रकारचं राजकीय भाष्य करणंही टाळलं.
२०१९ ला महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेनेने निवडणूक लढवली होती. महायुतीला स्पष्ट बहुमतही मिळालं होतं. मात्र निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष वाटून घेण्यावरून दोन्ही पक्षातलं भांडण विकोपाला गेलं. पुढे ही युती तुटली आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा कधीही कुणाला स्वप्नातही वाटला नाही असा प्रयोग झाला. महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेत आले. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून बाजूला व्हावं लागलं. त्यानंतर सातत्याने भाजपकडून या सरकारचा उल्लेख तीन पायांचं सरकार, तीन चाकांची रिक्षा असा होतो आहे. हाच संदर्भ घेत आज आदित्य ठाकरेंनी थ्री व्हिलरचं मस्त चाललं आहे असं उत्तर पत्रकारांना दिलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. खरं तर सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजप या सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. ९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. नुकत्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यावरून गदारोळ झाला होता. तसंच रोज विविध आरोप केले जात आहेत. या आरोपांना सत्ताधाऱ्यांकडून उत्तरही दिलं जातं आहे. मात्र आदित्य ठाकरे हे तसे मितभाषी आहेत. ते फारसं काही राजकीय भाष्य करताना दिसत नाहीत. आज मात्र आदित्य ठाकरेंना पॉलिटिकल प्रदूषण वाढलंय असं विचारलं असता थ्री व्हिलरचं मस्त चाललंय असं खास शैलीतलं उत्तर त्यांनी दिलं.
ADVERTISEMENT