उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याचे तहसीलदार राहुल पाटील यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. उमरगा येथील तक्रारदार यांना वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. अखेर लाच स्वरूपात 20 हजार रुपये घेतल्याप्रकरणी तहसीलदार गजाआड गेला आहे.
ADVERTISEMENT
तहसीलदार राहुल पाटील यांना अटक
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना त्यांच्या शेतामध्ये घराचे बांधकाम करायचे असल्याने त्यांना चार ट्रक वाळूची आवश्यकता होती. म्हणून तक्रारदार हे पंचांसह लोकसेवक असलेल्या तहसीलदार राहुल पाटील यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. वाळूबाबत. तहसीलदार यांना बोलले असता त्यांनी मध्यस्थीमार्फत चार ट्रक वाळू घेण्यासाठी व त्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांना एका ट्रकला 5 हजार रुपये प्रमाणे चार ट्रक वाळूसाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली.
एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडलं
दरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तहसीलदार राहुल पाटील यांच्या शासकीय निवासस्थानाच्या परिसरात सापळा रचला. यावेळी पंचासमक्ष 20 हजाराची लाच स्वीकारताना राहुल पाटील यांना एसीबीच्या पथकाने पकडून ताब्यात घेतले. एसीबीचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत संपते यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. भ्रष्ट अधिकारी सामान्य नागरिकांची कशी अडवणूक आणि आर्थिक पिळवणूक करतात, हे या प्रकारातून समोर आलं आहे.
गेल्या सात महिन्यात 14 ठिकाणी कारवाई, 3 अधिकाऱ्यांसह 16 लाचखोर जेरबंद
उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात भ्रष्ट कारभार सुरु आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि कारवाईचा धाक यांना राहिला नाही. एसीबीच्या मागील सात महिन्याच्या कारवाईत तर 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच लाच घेताना पकडलं आहे. गेल्या सात महिन्यात एसीबीने 14 ठिकाणी कारवाई करत 16 अधिकाऱ्यांना जेरबंद केले आहे. यात महसुलचे 2 अधिकारी तर महिला बालविकास विभागातील अधिकाऱ्याचा समावेश आहे. यासह महावितरण 1, महसूल 2, जिल्हा परिषद बांधकाम विभाग 1, पंचायत समिती 1, कृषी 2 तर पोलीस दलातील 3 भ्रष्ट कर्मचाऱ्यांना एसीबीने लाचखोरी करताना रंगेहात पकडले आहे.
ADVERTISEMENT