देशाचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपला जाहीरनामा घोषित केला. संकल्प पत्र 2022 अशा नावाने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यामध्ये अनेक मोठंमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
जाहीरनामा प्रसिद्ध करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ‘हे फक्त घोषणापत्र नाहीये. हे संकल्पपत्र आहे. उत्तर प्रदेशाला नव्या भविष्याच्या दिशेनं घेऊन जाणारं संकल्पपत्र. हे घोषणापत्र फडकवत समाजवादी पक्षाचे नेते विचारत आहेत की, यातील किती संकल्प पूर्ण झाले. मी त्यांना सांगू इच्छितो की, 212 संकल्प पूर्ण झाले आहेत.’
भाजपकडून घोषित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्याचबरोबर 2 सिलेंडर आणि स्कुटीही मोफत देण्याची घोषणा भाजपने केली आहे.
भाजकडून घोषणांचा पाऊस; महत्त्वाच्या घोषणा
– सर्व 18 विभागांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे युनिट स्थापन केले जाणार.
– मेरठमध्ये कोतवाल धन सिंह गुर्जर अत्याधुनिक पोलीस प्रशिक्षण केंद्र
– लव्ह जिहाद करणाऱ्यांना 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करणार
– मेरठ, रामपुर, आझमगढ, कानपूर आणि बहराईच येथे दहशतवाद विरोधी केंद्रांची स्थापना करणार.
– प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर मदत कक्ष
– 5 जागतिक स्तरावरील एक्झबिशन आणि कन्व्हेशन सेंटर स्थापन करणार
– 3 अत्याधुनिक डेटा सेंटर पार्क उभारणार
– कानपूरमध्ये मेगा लेदर पार्क सुरू करणार
– 10 लाख रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार
– बाबूजी कल्याण सिंह ग्राम उन्नत योजना लागू करणार
– 2000 बसेसच्या माध्यमांतून सर्व गावांना बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार
– उत्तर प्रदेशात अन्नपूर्णा कॅटीन सुरू करणार
– काशी, मेरठ, गोरखपूर, बरेली, झाशी आणि प्रयागराज येथे मेट्रो सुरू करणार
– मासेमारी करणाऱ्यांसाठी नदीकाठी लाईफ गार्ड नेमणार
– राजकीय आश्रम पद्धतीवर आधारीत विद्यापीठ स्थापन करणार
– ईडब्ल्यूएस कल्याण मंडळाची स्थापन करणार
– सर्व मजुरांना मोफत विमा सुरक्षा देणार
– दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1500 पेन्शन देणार
–महर्षि वाल्मिकी यांचं चित्रकूटमध्ये, संत रविदास यांचं बनारस येथे, निषादरजा गुहा यांचं श्रृंग्वेरपूर येथे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सांस्कृतिक केंद्राची स्थापना करणार.
ADVERTISEMENT