स्पष्टवक्ता उद्योजक काळाच्या पडद्याआड! बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं निधन

मुंबई तक

• 11:30 AM • 12 Feb 2022

स्पष्टवक्ते, उद्योजक आणि बजाज उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचं शनिवारी (12 फेब्रवारी) दुपारी पुण्यात निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची धुरा सांभाळत बजाज समूह जगभरात नावारुपाला आणण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी बंगाल येथील प्रेसीडेंसीमध्ये झाला होता. राहुल बजाज […]

Mumbaitak
follow google news

स्पष्टवक्ते, उद्योजक आणि बजाज उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचं शनिवारी (12 फेब्रवारी) दुपारी पुण्यात निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची धुरा सांभाळत बजाज समूह जगभरात नावारुपाला आणण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.

हे वाचलं का?

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी बंगाल येथील प्रेसीडेंसीमध्ये झाला होता. राहुल बजाज यांचं भारतातील यशस्वी उद्योगपतींच्या पंगतीत घेतलं जातं.

राहूल बजाज यांनी कॅथेड्रल अॅण्ड जॉन कॉनन स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफेंस कॉलेजमधून अर्थशास्त्र (ऑनर्स) पदवी घेतली. राहुल बजाज यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवीही घेतली होती. त्याचबरोबर हार्वर्ड बिजनेस स्कूलमधून एमबीएचं शिक्षणही पूर्ण केलं होतं.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि दानशूर जमनालाल बजाज यांचे नातू असलेल्या राहुल बजाज यांनी १९६५ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी बजाज उद्योगाची सूत्रं हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालीच बजाज समूहाने यशाची शिखरं गाठली.

बजाज समूहाची सूत्रं त्यांच्या हाती असतानाच देशाने उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राहुल बजाज यांनी सरकारवर सुनावलं होतं आणि पुढाकार घेऊन उद्योजकांची भीती सरकारपर्यंत पोहोचवली होती.

त्यांच्याच नेतृत्वाखाली बजाज समूहाने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत जम बसवला. 1980 च्या दशकात बजाज दुचाकी स्कूटरचा अग्रगण्य निर्माता होता. बजाज समूहाच्या ‘चेतक’ स्कूटरला एवढी मागणी होती होती की, त्यासाठी 10 वर्षांचा वेटिंग-पीरियड होता. राहूल बजाज अनेक कंपन्यांच्या बोर्डाचे अध्यक्ष देखील होते. त्याचबरोबर 2006 ते 2010 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

राहुल बजाज यांनी उद्योग क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर फ्रान्सकडून देण्यात येणारा ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च नागरी सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती, प्रणव मुखर्जी यांनी त्यांना 2017 मध्ये जीवनगौरवसाठी CII अध्यक्ष पुरस्कार प्रदान केला.

    follow whatsapp