शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यात झालेल्या बैठकीवर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. या कथित भेटीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
ADVERTISEMENT
“आमची अशी कोणतीही भेट झालेली नाही आणि जरी भेट झाली असली, तरी त्यात गैर काय? महाराष्ट्राचं किंवा देशाचं राजकारण हिंदुस्थान-पाकिस्तानसारखं नाहीये. पण ज्यांना माझ्यामुळे त्रास होतो, माझ्या लिहिण्या-बोलण्यामुळे त्रास होतो, अशा लोकांकडून अशा अफवा पसरवल्या जातात, मी त्यांचं स्वागतच करतो”, असा खोचक टोला यावेळी संजय राऊतांनी लगावला.
“महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटले, तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण काय? पण मुळात अशा पद्धतीची भेट झालेलीच नाही. मी कामात होतो. पण तरी अफवा पसरवण्यात आल्या. पण अशा अफवांमुळे राजकारण हलतं का? तर अजिबात नाही. महाराष्ट्राच्या सरकारला काही अडचणी निर्माण होतील का? अजिबात नाही. उलट अशा अफवा पसरवल्यामुळे आमचे तीन पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. त्यामुळे अशा अफवा पसरवण्याचे हे कारखाने एक दिवस दिवाळखोरीत जातील”, असंही राऊत म्हणाले.
“खूप आधी आशिष शेलार एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटले होते. तेव्हा आम्ही कॉफी देखील प्यायलो होतो. महाराष्ट्रातलं राजकारण हिंदुस्तान-पाकिस्तानसारखं नाही की गोळ्या घाला आणि संपवा. या प्रकारे अफवा पसरवल्यामुळे काहीही होणार नाही”, असा टोला राऊत यांनी लगावला. दरम्यान उद्यापासून राज्याचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कसा सामना रंगतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT