अगदी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात लागू झालेल्या लॉकडाउनला एक वर्षं पूर्ण झालं. त्यानंतर आता परत राज्यात लॉकडाउन लागू करण्यासाठी तयारी करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत. मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती म्हणजे एसओपी मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आता एक वर्षांपूर्वीसारखा संपूर्ण लॉकडाउन लागू करणं शक्य नसल्याचंही प्रशासनाकडून यापूर्वी सांगितलं गेलं होतं. त्यामुळे आता लॉकडाउन लागू झाला तर तो आधी सारखा नसेल. यंदाच्या कोरोनाचे नियम थोडे वेगळे असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे गेल्या वेळच्या लॉकडाउनपेक्षा आत्ताचा लॉकडाउनमध्ये काय फरक असू शकतो हे जाणून घेऊया..
ADVERTISEMENT
सर्वात पहिले जाणून घेऊया की, गेल्या वेळच्या लॉकडाउनचे नियम कोणते होते?
1) अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांनाच केवळ ऑफिस गाठण्याची परवानगी होती. पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी, बँकांमधील कर्मचारी, सर्व फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच घराबाहेरपडून ऑफिस गाठता येत होतं. त्यांच्यासाठी मर्यादित स्वरुपात बससेवा सुरू होती.
2) सुरूवातीच्या काळात तर मुंबई लोकल, रेल्वे सेवा पूर्णपणे बंद होती. नंतर ती मर्यादित स्वरुपात फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचा-यांसाठी सुरू करण्यात आली.
3) फक्त आणि फक्त अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होत्या. मात्र त्यासाठीही ठरवून दिलेल्या कालावधीचं पालन करणं आवश्यक होतं. काही शहरांमध्ये पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंतच भाज्या, फळं, किराणा माल उपलब्ध व्हायचा. काही ठिकाणी ही वेळ सकाळी 9 ते सध्याकाळी 5 ही वेळ होती. मात्र मर्यादित कालावधीचा नियम सगळीकडेच होता.
4) खासगी ऑफिसेस पूर्णपणे बंद होते. खासगी ऑफिसेसचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करायचे.
5) चहाच्या टप-या, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेल्स पूर्णपणे बंद होते. सिनेमागृह, नाट्यागृह, बाग-बगिचे, मैदानं, स्विमिंग पूल, शाळा सगळं पूर्णपणे बंद होतं
6) शहरात संचारबंदीचे नियम लागू होते. अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडता येत नव्हतं.
पण आता मात्र अशा प्रकारे संपूर्णपणे कडकडीत बंद पाळणं राज्याच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने शक्य नाही. पहिल्या लॉकाडाऊनमुळे नागरिकांना फार मोठी आर्थिक हानी पोहोचलीय. त्यामुळे लॉकडाउनकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहात आहोत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नंदूरबार दौ-यादरम्यान सांगितलं होतं. शिवाय आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाउनच्या स्वरुपासंदर्भात महत्त्वाची माहिती रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे लॉकडाउनबद्दल काय म्हणाले?
ते म्हणाले की, माननिय मुख्यमंत्र्यांबरोबर जवळ जवळ दीड तास टास्क फोर्सचे अधिकारी, आरोग्य विभाग आणि संबंधीत महत्त्वाच्या अधिका-यांची बैठक झाली. कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रति दिवस 10 टक्के भर पडत आहे, यासंदर्भात चर्चा झाली. हा वेग असाच राहिला तर येत्या काळात बेड्स कमी पडण्याची शंका व्यक्त केली गेली. खूप बेड्स कमी आहेत अशी स्थिती नाही. मात्र रुग्णसंख्या वाढली तर पडणारा ताण मोठा असेल. म्हणून दोन ते दिवसांत याबाबतचा आढावा घेतला जाईल, असं बैठकीत ठरलं. निर्बंध अधिक कडक कशाप्रकारे करता येतील यावर चर्चा झाली. खासगी ऑफिसेस 100 टक्के बंद करायचे का? आपण आत्ता लागू केलेले निर्बंध आणखीन कडक कसे करता येतील, त्यासाठी कोणते नियम लागू करता येतील यावर चर्चा झाली. लॉकडाउनकडे आपण वाटचाल करत आहोत हे निश्चित, असं राजेश टोपे म्हणालेत.
याबरोबरच रविवापासून राज्यात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. मुंबईत सह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातून प्रशासन संध्याकाळनंतरच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
शिवाय आत्ता नागपुरमध्ये लागू झालेल्या लॉकडाउनचं स्वरुपही पाहिलं तर तिथेही आत्ताच्या लॉकडाउनचं स्वरुप आधीपेक्षा थोडं वेगळं आहे.
ते कसं ते जाणून घेण्यासाठी नागपुरात लॉकडाउनमध्ये काय काय सुरू आहे ते पाहूया –
1) वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स
2) वृत्तपत्र, मीडीया संदर्भातील सेवा
3) दूध विक्री भाजीपाला विक्री, फळे विक्री, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी सुरू होत्या
4) सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवा 50 टक्के क्षमतेने सुरू होत्या,
5) माल वाहतूक सेवा, बांधकामं सेवा, उद्योग आणि कारखाने सुरू
6) किराणा दुकाने, अंडी आणि मास दुकाने, पशू खाद्य दुकाने
7) बँक आणि पोस्ट सेवा
8) कोरोना विषयक लसीकरण सेवा आणि चाचणी केंद्र, ऑप्टीकल्स दुकानं
9) निवासाकरिता असलेले हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरू
म्हणजे सर्व आवश्यक गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाला तर तोही अशाच स्वरुपाचा असण्याची शक्यता आहे.
प्रवासी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होणार नाही, लोकल – रेल्वे आधीसारखी पूर्णपणे थांबणार नाही.
किराणा माल, मांस, भाज्या फळं देखील पूर्ण दिवस मिळू शकतील.
मुख्य म्हणजे ऑनलाईन सुविधा सुरू असेल म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवता येणार नाही, मात्र होम डिलीव्हरीची मुभा असेल आणि त्यासाठी किचन रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहू शकेल.
काहीसा शिथिल स्वरुपाचा हा लॉकडाउन असण्याची शक्यता आहे. त्यातून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा, संध्याकाळनंतर होणा-या अनावश्यक गर्दीला आळा घालण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे नागरिकांचं आणि राज्याचं होणारं नुकसान थोड्या बहूत प्रमाणात टाळता येणं शक्य होईल.
ADVERTISEMENT