सातारा: हभप बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अडचणीत आले आहेत. राज्यात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत. वादग्रस्त आरोपांमुळे चर्चेत आलेले हभप बंडातात्या कराडकर नेमके आहेत तरी कोण? हे जाणून घेऊया सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तसेच ते समाज प्रबोधनकारही आहेत. मूळचे शुक्रवार पेठ कराड येथील रहिवासी असलेले बंडातात्या कराडकर यांचे वय 72 आहे. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता.
यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं. गो हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात कराडमधील मारूती बुवा कराडकर मठाची बारा नंबरची दिंडी असते. ही दिंडी बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असते आणि बंडातात्या कराडकर यांची दिंडी म्हणूनही या दिंडीची ओळख आहे.
व्यसनमुक्तीची चळवळ…
हभप बंडातात्यांनी 1996मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था काम करते. गेल्या 20 वर्षांपासून बंडातात्यांचं हे कार्य सुरू आहे. त्याशिवाय युवकांना इतिहास माहित व्हावा म्हणून ते गडकोटांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन करतात. 1997पासून ही सुरुवात झाली, ती आजतागायत सुरू आहे.
वारकरी शिक्षण देणारी पहिली शाळा…
व्यसनमुक्ती करतानाच त्यांनी गुरुवर्य भगवान मामा कराडकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पिंपरद या गावात ही संस्था कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेतून गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिलं जातं.
विशेष म्हणजे राज्यातील पहिली वारकरी शिक्षण देणारी ही शाळा आहे. तसेच कराड तालुक्यातील करवडी येथे गोशाळा असून बंडातात्या कराडकर यांना मानणारा एक मोठा युवक वर्ग कार्यरत आहे. कराड तालुक्यातील किल्ले सदाशिवगड ते सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावानजीक असलेल्या सागरेश्वर अभयारण्य या दरम्यान बंडातात्या कराडकर यांनी आपल्या वारकरी सांप्रदायतील सहकाऱ्यांसह सह्याद्रीच्या डोंगररांगा पायी पालथ्या घालत मागील वर्षी प्रतिकात्मक पायी दिंडी केली होती.
‘चूक झाली म्हणत…’ सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी बंडातात्यांची माफी
डाऊ कंपनीविरोधात 2008 साली तीव्र आंदोलन…
सुमारे 14 वर्षापूर्वी डाऊ या परदेशी कंपनीविरोधात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संघ व व्यसनमुक्त युवक संघाने राज्यभर तीव्र आंदोलन केले होते. कराडजवळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टाळ-मृंदगाच्या जयघोषात रास्तारोको करत वाहतूक ठप्प पाडली होती. या आंदोलनाला यश येऊन डाऊ कंपनीला काढता पाय घ्यावा लागला होता.
दिवाळी साजरी करू नका…
महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन काळात मंदिरे खुली न केल्यामुळे बंडातात्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यांनी एक पत्रं लिहून सरकारचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी करू नका, असं आवाहन केलं होतं. “नरक चतुर्दशीचे अभंगस्नान. आपण भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून करतो भारतातील सर्व मंदिरे खुली आहेत. पण महाराष्ट्रातील मंदिरे आपल्या नरकासुराने गेले आठ महिने कृष्णरुपी विठ्ठलाला सत्यभामा, रुक्मिणीसह बंदीवासात टाकले असताना आपण कोणता आनंद साजरा करणार आहात? असा सवाल विचारला होता.
कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका व वणीची सप्तशृंगी बंदिस्त असताना कोणत्या लक्ष्मीचे पूजन करणार आहात? येथे असुरांचे राज्य असताना कसली बलिप्रतिपदा करत आहात? या राज्यात दारूची दुकाने, भाजी मंडई, हॉटेल्स, ढाबे, विवाह पार्ट्या, पार्टी मीटिंग सर्रास चालू आहे. मात्र वार्या, भजन सप्ताहांना पूर्ण बंदी आहे. आणि आपण तरीही दिवाळी साजरी करणार आहात का?
हिंदूंचा कैवारी नास्तिक व अधर्मी असुरांच्या ताब्यात आहे. तो इच्छा असूनही मंदिरे सुरू करू शकत नाही. एवढ्या करता आपण दिवाळी साजरी न करता यांच्या नावाने शिमगा साजरा करा. आंघोळ करायची असेल तर यांच्या नावाने व गोड खायची असेल तर यांच्या चौदा व्यक्तीच्या नावाने खा. याउपर आपली मर्जी”, असं आवाहन त्यांनी एका निवेदनाद्वारे करून राज्य शासनाच्या धोरणांविरूद्ध संताप व्यक्त केला होता.
‘माफी मागितली असली, तरी बंडातात्या कराडकरांवर कारवाई होणार’; महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश
पद्मश्रीची शिफारस नाकारली….
2019 च्या पद्मश्री पुरस्कारासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी बंडातात्या कराडकरांकडून त्यांची माहिती मागवली होती. त्यावर आपण कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही, असं सांगत त्यांनी स्वत:च्या कार्याची माहिती देण्यास नकार दिला होता. बंडातात्या कराडकर यांची आजवरची वाटचाल पाहता बंडातात्या कराडकर हे एक समाज प्रबोधक म्हणूनच कार्यरत असल्याचे पहावयास मिळतात.
ADVERTISEMENT