पहलगाम (जम्मू-काश्मीर): जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एका हल्लेखोराचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो घटनास्थळाचा आहे, ज्यामध्ये तो हातात रायफल घेतलेला दिसत आहे. पण हा त्याचा पाठमोरा फोटो असल्याने दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाही. दरम्यान, आता 3 दहशतवाद्यांचे स्केचेस समोर आले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या वर्णनाच्या आधारे तीन दहशतवाद्यांचे स्केचेस तयार करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांसाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर NIAचे पथक हे तात्काळ श्रीनगरमध्ये पोहोचले आहे. तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक पथके देखील उपस्थित आहेत. लष्कर, सीआरपीएफ, एसओजी आणि जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे मुघल रोडवर सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
तीन दहशतवाद्यांचे स्केच जारी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधरण सहा दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हा भ्याड हल्ला केला होता. ज्यामध्ये त्यांनी निष्पाप लोकांचे बळी घेतले.
हे ही वाचा>> "जा..मोदीला जाऊन सांग...", दहशतवाद्यांनी पतीला मारलं ठार, पत्नीने सांगितला हल्ल्याचा A टू Z थरार!
काही प्रत्यक्षदर्शी पर्यटक आणि स्थानिकांच्या मते या हल्ल्यात दोन पाकिस्तानी दहशतवादी देखील सहभागी होते. कारण हल्ल्यावेळी ते एकमेकांशी पश्तूमध्ये बोलत होते.
हे ही वाचा>> 'तो' होता Navy अधिकारी.. नुकतंच झालेलं लग्न, पत्नीसोबत आलेला हनिमूनला अन्...
याशिवाय काही स्थानिक फुटीरतावादी आणि काश्मीरमधील दहशतवाद्याची या हल्ल्यात मदत झाली असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
पहलगाममधील सुरक्षा दलांची कारवाई संपल्यानंतर, एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली. त्याचवेळी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पहलगाम रुग्णालयातून श्रीनगरला पाठवण्यात आले आहेत. मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये लोकांना निवडकपणे लक्ष्य करण्यात आले.
या हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (23 एप्रिल) सकाळी त्यांचा सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावरच सोडून घरी परतले. दिल्ली विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांनी पंतप्रधान मोदींना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातूनच काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही वेळापूर्वीच पहलगाममधील घटनास्थळी जाऊन पाहणी केली..पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यावेळी अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सतत शोध मोहीम सुरू आहे.
ADVERTISEMENT
