– कृष्णा पांचाळ, कर्जत
ADVERTISEMENT
Ajit pawar Karjat speech news : मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी पडले. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे प्रफुल पटेल यांनी समाज माध्यमावरून कळवले. पण, अजित पवारांचं आजारपण राजकीय असल्याच्या दबक्या चर्चा सुरू झाल्या. इतकंच नाही, तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी अजित पवारांवर थेट हल्लाच चढवला. राजकीय आजारपणाच्या टीकेला अजित पवारांनी अखेर उत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार सभा कर्जतमध्ये बुधवारी (२९ नोव्हेंबर) झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी मराठा आरक्षणासह राज्यातील विविध ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य केलं. याच वेळी त्यांनी डेंग्यू आजारावरून झालेल्या टीकेला उत्तर दिले.
अजित पवारांना डेंग्यू, कुणी उपस्थित केले होते प्रश्न?
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणला सुरूवात केली. त्याच वेळी अजित पवारांना डेंग्यू झाल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच काळात छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचाराला गेले होते. या मुद्द्यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या आजारपणावर शंका उपस्थित होईल, असे विधान केले होते.
हेही वाचा >> “…या नालायकीस काय म्हणायचे?”, ठाकरेंचा शिंदेंवर पुन्हा वार
राऊत म्हणाले होते की, “दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू झाला आहे. ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना कोणता मच्छर चावला आणि डेंग्यू झाला हा तपासाचा भाग आहे. मोक्याच्या क्षणी त्यांना मच्छर चावला आणि डेंग्यू झाला”, अशा शेलक्या शब्दात संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता.
रामदास कदम अजित पवारांच्या आजारपणाबद्दल काय बोलले होते?
“मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हा नेमका अजितदादांना डेंग्यू झाला. अजित पवारांचे २० पैकी २० आमदार एकनाथ शिंदे आणि शासनाच्या विरोधात मंत्रालयात आंदोलन करू लागले. त्यांनी मंत्रालयाचं गेट बंद केलं, हेच मला कळत नाही”, असे रामदास कदम अजित पवारांच्या आजारपणाबद्दल बोलले होते.
हेही वाचा >> पती-मुलांना सोडून पाकिस्तानात गेलेली अंजू पुन्हा परतली भारतात! कारण…
अजित पवारांनी राऊत-कदमांना काय दिलं उत्तर?
कर्जत येथील निर्धार सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, “मला डेंग्यू झाला. १५ दिवस माझी तब्येत थोडीशी… मला अशक्तपणा आला होता. डॉक्टरांनी मला काळजी घ्यायला सांगितली, त्यापद्धतीने मी काळजी घेतली. आणि खुशाला चर्चा सुरू झाली की, अजित पवारला राजकीय आजार झाला. मी असला लेचापेचा नाही, राजकीय आजार होणारा! जे काही असेल ते तोंडावर बोलणारा माणूस आहे. अरे कशा करता…?”, असा सवाल करत अजित पवारांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.
ADVERTISEMENT