Deepak Kesarkar Sanjay Raut : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेना-भाजप युती होणार होती. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना तसा शब्द दिला होता, पण संजय राऊतांनी माहिती लीक केली. राऊतांनी शरद पवारांना सांगितलं नसतं, तर उद्धव ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकत्र असते, असा खळबळजनक दावा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला.
ADVERTISEMENT
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दीपक केसरकर यांची उलटतपासणी झाली. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना भेटून निघालो, तेव्हा माझा पाठलाग केला गेला होता, असे केसरकरांनी सांगितले होते. यावरून संजय राऊतांनी उंदीर म्हणत टोला लगावला होता.
दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना काय दिले उत्तर?
तुम्ही सुनावणीत असं म्हणाला होतात की, बंडानंतर कुणीतरी तुमचा पाठलाग करत होतं. त्यावर संजय राऊत असं म्हणालेत की, ‘उंदरांचा पाठलाग कोण करत? केसरकरांनी सावंतवाडीमधून निवडणूक लढवून दाखवावी.’ या विधानावर दीपक केसरकरांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, “अहो अशी परिस्थिती होती की, नारायण राणेंची सिंधुदुर्गावर भक्कम पकड होती की, या संजय राऊतांना राहायला हॉटेलमध्ये रुम मिळत नव्हती. यांच्या गाडीत कुणी पेट्रोल टाकत नव्हते, अशी परिस्थिती या लोकांची होती.”
हेही वाचा >> “मविआ सोडणार, भाजपसोबत सरकार… उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलं होतं वचन”
उद्धव ठाकरेंनी केला होता फोन -दीपक केसरकर
“माझा आणि राणेंचा झालेला वाद हा तात्विक वाद होता. पंरतु त्या तात्विक वादामधून तुमचे शिवसेनेत अस्तित्व निर्माण झाले. मी ज्यावेळी शिवसेनेमध्ये नव्हतो. त्यावेळी शिवसेनेला सगळ्या निवडणुका मिळवून 40 हजार मते मिळाली. मी ज्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंनी मला फोन केला म्हणून प्रवेश केला”, असा गौप्यस्फोट केसरकर यांनी केला.
हेही वाचा >> Deepak Kesarkar अचानक का गेले नारायण राणेंच्या घरी? ‘त्या’ बॅगेतून राणेंना काय दिलं?
“तुम्ही (संजय राऊत) मला काहीही म्हणा… तुमच्यासारखी भाषा मी बोलू शकत नाही. 1 लाख 10 हजार मते वाढली आहेत. तुमचा खासदार तिथे निवडून आला. खासदार निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे भाषण केले, त्यामध्ये माझा उल्लेख होता की, दीपक केसरकरांनी बंड केलं. त्याकाळात मी माझ्या आमदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे दिला”, असे दीपक केसरकर म्हणाले.
“राऊतांनी पवारांना सांगितलं, नाहीतर ठाकरे-मोदी एकत्र असते”
“एवढं सगळं करणाऱ्या माणसाबद्दल तुम्ही असं बोलता? संजय राऊतांमुळे शिवसेनेची अशी परिस्थिती आलेली आहे. अजित पवारांनी दिलेलं विधान बघा. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मीटिंग मी घडवून आणली होती. त्याच्यानंतर काय घडलं… हे संजय राऊत यांनी जाऊन लीक केले. शरद पवारांना सांगितलं. नाहीतर आज उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र दिसले असते. कारण त्यांनी ते मान्य केले असते. संजय राऊतांनी शिवसेनेचे किती नुकसान केले? शिवसैनिकांनी समजून घेतलं पाहिजे की, संजय राऊत कसे आहेत?”, असे म्हणत केसरकरांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT