Gram Panchayat Election 2023 Result : राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत जामखेडमध्ये माजी मंत्री राम शिंदेंनी बाजी मारली आहे. रोहित पवारांना झटका बसला आहे. कर्जतमधील सहा ग्रामपंचायतीवर राम शिंदेंनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. (Rohit Pawar set back in gram panchayat election 2023)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत जामखेड या त्यांच्या मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. कर्जत तालुक्यामधील सहा ग्रामपंचायती, तर जामखेड तालुक्यामधील तीन ग्रामपंचायती अशा एकूण 9 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली.
कोणत्या ग्रामपंचायती रोहित पवारांकडे?
यामध्ये कर्जत तालुक्यातील सहा ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले, असून सर्वच्या सर्व ठिकाणी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे. तर जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती या आमदार रोहित पवार यांच्या शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे आल्या आहेत. एक ग्रामपंचायत ही भाजपचे राम शिंदे यांच्याकडे गेली आहे.
एकूण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील नऊ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे राम शिंदे यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे.
आमदार रोहित पवारांना स्थानिक राजकारणात अपयशी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कर्जत-जामखेड मधील लागलेला निकाल आमदार रोहित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
ग्रामपंचायत निवडणूक निकालावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, “पक्षाच्या नावावर वा चिन्हावर या निवडणुका होत नाही. ग्रामपंचायतीचे विषय फार वेगळे असतात. गट-तट असतात. त्याच्यामध्ये अनेक पक्षांचे नेते एकत्र येऊन त्या निवडणुका लढतात. याच्यावरून जर कुणी आपली पाठ थोपटवून घेत असेल, तर ते योग्य नाही.”
महत्त्वाचे >> कोणत्या जिल्ह्यात कुणी मारली बाजी, सर्व ग्रामपंचायत निकाल जाणून घ्या येथे
“राहिला प्रश्न काही ठराविक ग्रामपंचायतींचा… तिथे असणारे विरोधातील नेते आहेत. लोक म्हणताहेत की पैशांचा वापर खूप झाला. पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असेल, तर ही गोष्ट योग्य नाही. ग्रामपंचायतीलाच एवढा मोठा पैसा दिला जात असेल, तर आमदारकीला आणि खासदारकीला काय होईल, याचा एक अंदाज आपल्या सगळ्यांना आलेला आहे”, असे प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
जामखेड एकूण ग्रामपंचायती – 3
राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) आमदार रोहित पवार – 2
भाजप आमदार राम शिंदे -1
कर्जत एकूण ग्रामपंचायती – 6
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार रोहित पवार – 0
भाजप आमदार राम शिंदे – 6
ADVERTISEMENT