India Today Conclave Sharad Pawar on President Rule: मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (4 ऑक्टोबर) इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये (India Today Conclave) बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला होता. 2019 मध्ये शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लावली होती. असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. ज्याला शरद पवार यांनी देखील कॉनक्लेव्हमध्येच बोलताना मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. (if they got good number why they are listen to me regarding president rule sharad pawar attack on devendra fadnavis)
ADVERTISEMENT
‘जर भाजपला चांगल्या जागा मिळाल्या होत्या, त्यांना बहुमत मिळालेलं होतं. तर त्यांना राष्ट्र्रपती राजवट लावण्याची गरजच का भासली? त्याबाबत ते माझं किंवा इतर कोणाचे का ऐकत होते?’ असा सवाल करत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केला.
फडणवीसांच्या राष्ट्रपती राजवटीच्या दाव्यावर शरद पवारांनी सरळच सांगितलं, ते माझं का…?
इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. जिथे शरद पवार यांना देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रपती राजवटीबाबत जे भाष्य केलं होतं त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याचबाबत शरद पवार बोलताना म्हणाले की, ‘मी काही सरकारमध्ये नव्हतो, सरकारमध्ये भाजप होतं. त्यांना जास्त जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय त्यांचा होता. अशावेळी जर त्यांनी मला किंवा इतर कोणालाही याबाबत विचारलं तर त्याला आम्ही का नाही म्हणावं?’
‘इथे मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे. त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेले. मग ते मला का विचारत होते? जर त्यांच्याकडे बहुमत होतं तर त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय का घेतला?’
देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की, तुमचं अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी पडद्यामागे बोलणी सुरू होती. असा जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
तेव्हा ते म्हणाले की, ‘ही पूर्णपणे चुकीची माहिती ते देत आहेत. पण माझा एक प्रश्न आहे. जर त्यांना चांगले नंबर मिळाले होते तर ते माझे किंवा इतर कोणाचे का ऐकत होते?’ असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांनाच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रपती राजवटीबाबत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांविषयी नेमका काय दावा केला?
2019 जे घडलं, त्यात शरद पवारांची भूमिका काय होती? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण सत्य ऐकण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. कारण राजकारणात हे पूर्णपणे मांडण्याची एक वेळ असते. तुम्हाला योग्य वेळी हीट करायचं असतं.”
“मी इतकंच सांगेन २०१९ मध्ये जेव्हा शिवसेनेने आम्हाला धोका देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू केली. आमच्या लक्षात आले की, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची खुणावतेय. ते आता आपल्यासोबत येणार नाही. त्यावेळी आम्ही विचार करत होतो की यावर उपाय काय? त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की, आम्ही येऊ शकतो कारण आम्हाला तीन पक्षाचं सरकार नकोय. आम्हाला स्थिर सरकार हवं. मी त्यांना सांगितलं की, चर्चा करून सांगतो.”
हे ही वाचा>> Guardian Minister: अजित पवारांपुढं भाजप नमलं, दादांनी ‘हवं ते’ घेतलं; पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर!
“नंतर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांसोबत आमची बैठक झाली. शरद पवारांनी हे सांगितलं की आम्ही भाजपसोबत येऊ. माझ्यावर आणि अजित पवारांवर जबाबदारी टाकली गेली. आम्ही युती कशी असेल, कुणाला कोणतं खातं मिळेल, कुणाला कोणता जिल्हा मिळेल, हे ठरवलं. युती करण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. तर त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. त्यानंतर विचार करून राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली.”
“त्यानंतर एका दिवशी पहाटे शरद पवारांनी आपला निर्णय बदलला. त्यानंतर अजित पवारांना वाटलं की, हे योग्य नाही. कारण आपण इतके पुढे गेलो आहोत आणि त्यानंतर या प्रकारे निर्णय बदलणे, हा विश्वासघात होईल. त्यामुळे त्यांनी सांगितलं की, मी तर भाजपसोबत जाईन. त्यांनी हे शरद पवारांनाही हे सांगितलं. कारण तुम्ही ही आघाडी केली आणि या टप्प्यावर हे बदलू शकत नाही. त्यानंतर आम्ही शपथ घेतली. त्यानंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे”
“आम्ही त्यावेळी चर्चा अजित पवारांसोबत केली नव्हती. आम्ही चर्चा शरद पवारांसोबत केली होती. शरद पवारांशी बोलून निर्णय झाला होता. शरद पवारांच्या संमतीनंतरच अजित पवार आणि मी बसलो होतो.”
“बघा, ते नव्या नव्या गोष्टी सांगत असतात. एक दिवस त्यांनी सांगितलं की, राष्ट्रपती राजवट उठवायची होती म्हणून मी हे केलं. आता मी तुम्हाला त्याचं पूर्ण सत्य सांगतो. हे मी राखून ठेवलं होतं. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पनाच शरद पवारांची होती. शरद पवारांनी सांगितलं की, मी इतक्या लवकर भूमिकेवरून यू टर्न घेऊ शकत नाही. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा.”
हे ही वाचा>> Devendra Fadnavis: ‘2019 ला राष्ट्रवादीचं ‘ते’ पत्र माझ्या घरातच टाइप केलेलं..’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
“राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेन. नंतर मी भूमिका घेईन की, महाराष्ट्राला स्थिर सरकार हवं यासाठी आम्ही भाजपसोबत जात आहोत. इतकंच नाही, तर त्यापुढचंही सांगतो. राष्ट्रपती राजवट जेव्हा लागते, तेव्हा प्रत्येक पक्षाला पत्र देऊन विचारलं जातं की, तुम्ही सरकार बनवणार का? तसंच पत्र राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं गेलं. आणि आम्ही सरकार बनवणार नाही, हे जे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं ते मी टाईप केलं होतं. ते माझ्या घरी टाईप केलं होतं. त्यात शरद पवारांनी दुरुस्ती करायला सांगितली. ते बदल करून राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्र दिलं गेलं. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. बघा शरद पवार मोठे व्यक्ती आहेत. अनेक गोष्टी बोलतात, पण सत्य हे आहे की, शिवसेनेने विश्वासघात केला. त्यावेळी शरद पवारांनीच आमच्यासोबत चर्चा केली होती. आमच्यासोबत सरकार बनवू इच्छित होते.” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ADVERTISEMENT