Bhagirath Bhalke : केसीआर यांचा धक्का, राष्ट्रवादीकडून तटबंदी सुरू!

मुंबई तक

27 Jun 2023 (अपडेटेड: 27 Jun 2023, 07:31 AM)

मंगळवारी भगीरथ भालकेंनी बीआरएसची वाट धरली. त्यांच्या पक्षप्रवेशाची संधी साधत केसीराव यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

NCP Leader bhagirath bhalke joined BRS in the presence of k chandrasekhar rao

NCP Leader bhagirath bhalke joined BRS in the presence of k chandrasekhar rao

follow google news

KCR Maharashtra Tour : तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव भगीरथ भालके यांच्या प्रवेशानिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तब्बल 600 गाड्यांच्या ताफ्यासह पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दुसरीकडे भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश राष्ट्रवादीसाठी धक्का मानला जात असून, पक्षाने लगेच विधानसभा मतदारसंघाच्या तटबंदीला सुरूवात केली आहे. भालके निवडून कसे येतात, असा इशाराच राष्ट्रवादीच्या नेत्याने तातडीने घेतलेल्या एका बैठकीत दिला.

हे वाचलं का?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितीकडून महाराष्ट्रात बस्तान बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत राष्ट्र समितीकडून महाराष्ट्रातील काही नेत्यांना पक्षात सामावून घेतले असून, पंढरपुर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालकेंनी बीआरएसची वाट धरली आहे.

भालकेंच्या प्रवेशानिमित्ताने के. चंद्रशेखर राव यांचं शक्तिप्रदर्शन

मंगळवारी भगीरथ भालकेंनी बीआरएसची वाट धरली. त्यांच्या पक्षप्रवेशाची संधी साधत केसीराव यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. 600 गाड्यांचा ताफा आणि मंत्रिमंडळाला सोबत घेऊन आलेल्या केसीराव यांचा महाराष्ट्र दौरा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा >> Maharashtra politics : भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, रणनीती ठरली!

अभिजीत पाटलांचा प्रवेश अन् भालकेंनी निवडली वेगळी वाट

पंढरपुर विधानसभा पोटनिवडणुकीत स्व. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमदेवारी दिली होती. त्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलं. त्यांच्या प्रवेशावेळीच शरद पवारांनी पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि भालकेंसह त्यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली. तेव्हापासूनच भालके वेगळी वाट निवडणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर महिनाभरातच भालके भारत राष्ट्र समितीत जाणार हे समोर आलं.

‘भगीरथ भालके निवडून कसे ते बघतो’, उमेश पाटील बैठकीत काय बोलले?

भगीरथ भालकेंनी बीआरएसची वाट निवडल्यानंतर राष्ट्रवादीने पंढरपूर मतदारसंघात पक्षाला आणखी गळती लागणार नाही, याची खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. याचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक पंढरपुरात सोमवारी घेतली. राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थितीत होते. याच बैठकीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी भालकेंना इशारा दिला.

हेही वाचा >> ढासळलेला बालेकिल्ला NCP पुन्हा बांधणार? रोहित पवारांच्या खांद्यावर पक्षाने दिली नवी जबाबदारी

“भालके यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी जाणार नाही. भगीरथ भालके हे विधानसभेसाठी लागणाऱ्या खर्चाच्या यंत्रसामुग्रीच्या लालसे पोटी राष्ट्रवादी सोडून बीआरएस पक्षात गेले आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट जोमाने राष्ट्रवादी काम करेल”, असं पाटील म्हणाले.

“(कै)आमदार भारत भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात उभा केलेला विठ्ठल परिवाराच्या नेत्यांनीही भगीरथ भालके यांची साथ सोडल्याचे यावेळी दिसून आले. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु भगीरथ भालके हे कसे निवडून येतात तेही आम्हाला आता बघायचे आहे”, असाही इशारा उमेश पाटील यांनी दिला आहे.

    follow whatsapp