KCR in Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात गुलाबी लाट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर अशा सीमाभागाला लागून असलेल्या जिल्ह्यांत केसीआर त्यांच्या पक्षाचं मूळ रुजवू पाहत आहेत. केसीआर यांच्या बीआरएसमुळे महाराष्ट्रात कुणाला फटका बसणार याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. 600 गाड्या घेऊन जोरदार शक्तिप्रर्दशन घडवणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीवर आता महाविकास आघाडीने भाजपची बी टीम असल्याचा ठपका ठेवला आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत राष्ट्र समितीवर बोलताना बी टीमचा उल्लेख करत सूचक भाष्य केलं होतं. त्यानंतर आता खासदार संजय राऊतांनी बीआरएसला बी टीम असल्याचा दावा केलाय. दोन्ही नेते नेमके काय म्हणालेत, ते आधी बघुयात…
केसीआर यांच्या बीआरएसबद्दल शरद पवार काय म्हणालेले?
रावेरमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवार यांना केसीआर यांच्या बीआरएसमुळे कुणाला फटका बसेल?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले होते की, “मागची निवडणूक (विधानसभा निवडणूक 2019) तुम्ही आठवली, तर आम्हाला थोडं नुकसान सहन करावं लागलं. ते नुकसान वंचितच्या वतीने त्यांनी जी काही मते वळवली त्यामुळे झालं. लोकशाहीमध्ये त्यांचा (बीआरएस) अधिकार आहे. मी नाही म्हणत नाही. कुणालाही कुठेही जाऊन काम करायचा अधिकार आहे.”
हेही वाचा >> BRS : तेलंगणात एकहाती सत्ता, आता महाराष्ट्रावर नजर; कोण आहेत केसीआर?
“महाराष्ट्रावर काय परिणाम होईल हे बघितलं, तर माहिती नाही. काही वेळेला राजकारणात स्वतः लढायचं असतं. आणि दुसरं म्हणजे एक-दोन टीम तयार करायच्या असतात, पायात पाय घालण्यासाठी… त्याला साधारणतः राजकारणातील बी टीम म्हणतात. आता ही बी टीम आहे की काय, हे आता कळेल”, असं पवार म्हणाले होते. पण, पवारांनी वंचितचा उल्लेख केला, त्यामुळे त्यांचा रोख बीआरएसही बी टीम आहे, असाच काहीसा होता.
संजय राऊत काय म्हणाले?
के.चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्रातील शक्तिप्रदर्शनाबद्दल संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील राजकारणात केसीआर यांचा कोणताही परिणाम होणार नाही. परिणाम झालाच तर तेलंगणात होईल. याच पद्धतीने नौटंकी करत राहिले तर तेलंगणातही ते पराभूत होतील. त्याच भीतीमुळे ते महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न करत आहेत.”
“600, 700 गाड्या घेऊन तेलंगणातील हा पक्ष महाराष्ट्रात आलाय. हे पैशाचं, संपत्तीचं, सत्तेचं ओंगळवाणं दर्शन आहे, जे की इथे शिंदे करताहेत. शिंदे-मिंधे गट याच पद्धतीने प्रदर्शन करतोय. करू द्या. या राज्याची जनता सुज्ञ आहे. हे आता स्पष्ट झालंय की, केसीआर भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे.”
हेही वाचा >> Lok Sabha : भाजपचं मिशन-80 काय?; खासदारांना फॉर्ममधून द्यावा लागणार हिशोब
“या आधी एमआयएम हैदराबादवरून आले होते. आता त्याच हैदराबादवरून केसीआर आले आहेत. फक्त इथे महाविकास आघाडीला काहीतरी त्रास द्यायचा. मतविभागणी करण्याचा प्रयत्न करायचा. यापलीकडे मला त्यांचा वेगळा हेतू दिसत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
विरोधकांच्या आघाडीसाठी पुढाकार, स्वबळाची तयारी…
केसीआर यांच्या राष्ट्रीय राजकारणाचं नेतृत्व करण्याच्या महत्त्वकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्याराज्यांतील नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. महाराष्ट्रात केसीआर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनाही भेटून गेले होते. पण, अचानक त्यांनी त्यांचा रस्ता बदलल्याचे दिसत आहे. अलिकडेच पाटण्यात विरोधकांची बैठक झाली. या बैठकीलाही के. चंद्रशेखर राव गेले नव्हते. त्यातच आता त्यांनी महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
हेही वाचा >> Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?
विरोधकांनी केसीआर यांच्यावर भाजपची बी टीम असा ठपका ठछेवला आहे. त्यामुळे आगामी काळात आणि निवडणूक प्रचारात केसीआर यांना भाजपची बी टीम या विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावं लागेल असंच दिसतंय.
ADVERTISEMENT
