मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षांतर्गत राजकीय वैचारिक भूमिकेबाबत सुप्त मतभेद असल्याची चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचे ट्वीट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. कोल्हे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी संबंधित ‘नेमकेचि बोलणे’ आणि ‘द न्यू बीजेपी’अशी दोन स्वतंत्र पुस्तके त्यात वाचत आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला आहे. असं असताना आता अशाप्रकारच्या ट्विटने शंकेला अधिकच वाव मिळाला आहे. (ncp mp amol kolhe on the way to bjp the new bjp book in hand see what he said actually)
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
जागतिक पुस्तक दिनानिमित्त अमोल कोल्हे यांनी पुस्तक वाचत असतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत कोल्हे ‘नेमकेचि बोलणे’ हे पुस्तक वाचताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या हातात ‘द न्यू बीजेपी’ हे पुस्तक दिसत आहे. ‘विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण? वाचाल तर वाचाल! जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!’ असा मजकूर अमोल कोल्हेंच्या ट्वीटमध्ये आहे.
या ट्वीटनंतर अमोल कोल्हे भाजपात जाणार या चर्चांना पुन्हा सुरवात झाली. ही चर्चा आणि बातम्या माध्यमांत चर्चिल्या गेल्यानंतर अमोल कोल्हेंनी संध्याकाळी इस्लामपूर येथील कार्यक्रमात मात्र या ट्वीटचा खुलासा केला..
“दोन पुस्तकं वाचत असताना मी फोटो टाकले. मी इस्लामपूरमध्ये येताना अनेकांचे मला फोन आले. एक पुस्तक होतं शरद पवारांच्या भाषणांचं ‘नेमकेचि बोलणे’. दुसरं पुस्तक होतं नलिन मेहतांचं ‘द न्यू बीजेपी’. बातम्या लगेच सुरू झाल्या की नक्की अमोल कोल्हेंना सुचवायचंय काय? मला फक्त एवढंच सुचवायचं होतं की विचारधारा कोणतीही असली, तिचा विरोध जरी करायचा असला तरी तिचा आधी अभ्यास करायला लागतो हे जास्त महत्त्वांच आहे. ते तुमच्या वाचनातून येतं”, असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या 45 मिनिटांच्या माहितीपटात नथुराम गोडसे यांची भूमिका केली होती. यामुळे कोल्हे यांच्याभोवती वाद निर्माण झाला होता. त्यावेळी पडद्यावरील भूमिका आणि राजकीय भूमिका यात गल्लत करू नका, असे कोल्हे यांचे म्हणणे होते.
तर एखाद्या व्यक्तिमत्त्वाची कलाकार म्हणून भूमिका करणे, यात काही आक्षेपार्ह नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे म्हणणे होते. कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली होती. तो प्रकार विस्मरणात जात नाही, तोच जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने दोन विचारसरणी समजावून घेण्यासाठी ग्रंथाशिवाय उत्तम गुरू कोण असू शकतो, असे सांगत कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि भाजपच्या पुस्तकाची निवड केल्याचे दिसले.
याबाबत उलटसुलट चर्चांना सुरुवात झाल्यानंतर अमोल कोल्हेंनी ट्वीटवरील खुलासा केला असला तरी कोल्हे भाजपमध्ये जाणार की नाही याची राजकीय वर्तुळात आणि माध्यमांत चर्चा थांबलेली नाही.
ADVERTISEMENT