मोठी बातमी: सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष, पवारांचा माईंड गेम; अजितदादांना सारलं बाजूला!

मुंबई तक

10 Jun 2023 (अपडेटेड: 10 Jun 2023, 02:34 PM)

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड केली आहे. तर अजित पवारांवर कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.

NCP president Sharad Pawar has appointed MP Supriya Sule and MP Praful Patel as the party's working president ajit pawar maharashtra political news

NCP president Sharad Pawar has appointed MP Supriya Sule and MP Praful Patel as the party's working president ajit pawar maharashtra political news

follow google news

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत अध्यक्ष शरद पवारांनी पुन्हा पक्षात राजकीय भूकंप घडवून आणला आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी (Sharad Pawar) भाकरी फिरवणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर आज (10 जून) म्हणजे पक्षाच्या वर्धापन दिनीच एक अत्यंत मोठा निर्णय घेत पक्षातील पुढील वाटचाल कशी असेल हे ठरवून टाकलं आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड केली आहे. याशिवाय इतरही अनेक नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मात्र, या सगळ्यामध्ये अजित पवार यांना पूर्णपणे डावलण्यात आलं आहे. त्यांना देशाच्या पातळीवर कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. (ncp sharad pawar working president supriya sule praful patel ajit pawar maharashtra political news)

हे वाचलं का?

प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष; अजित पवारांवर कोणतीच जबाबदारी नाही!

वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी अचानकपणे कार्यकारी अध्यक्ष पदावर सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा केली. पाहा यावेळी शरद पवार नेमकं काय-काय म्हणाले.

‘देशात परिवर्तन आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्हा सगळ्या लोकांना मजबुतीने काम करावं लागणार आहे. यासाठी आम्ही काही साथीदारांवर काही ना काही जबाबदारी देण्याचं निश्चित केलं आहे. जसं की, प्रफुल पटेल यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देत आहोत. तसंच त्यांच्याकडे मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड गोवा या राज्यांची आणि राज्यसभेची जबाबदारी त्यांच्यावर देत आहोत.’

‘दुसरी जबाबदारी सुप्रिया सुळे संसदेच्या सदस्या यांच्यावर देखील आम्ही कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवत आहोत. त्यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला-युवक आणि लोकसभेतील समन्वय याबाबतची जबाबदारी देत आहोत.’ अशी घोषणा शरद पवारांनी यावेळी केली आहे.

पाहा यावेळी इतर कोणा-कोणावर पवारांनी कोणती जबाबदारी सोपावली आहे.

  1. सुनील तटकरे नॅशनल जनरल सेक्रेटरी.. त्यांच्याकडे ओडिशा, प. बंगाल तसंच शेतकरी आणि त्यासंबंधी इतर मुद्द्यांची जबाबदारी देण्यात येत आहे.

  2. डॉ. योगानंद शास्त्री यांच्याकडे ऑर्गनायझेशन सेवा दल आणि दिल्लीची जबाबदारी सांभाळतील.

  3. के के शर्मा नॅशनल जनरल सेक्रेटरी असतील. यांच्याकडे उत्तरप्रदेश, उत्तराखंड पंचायत राज ही जबाबदारी असेल.

  4. फैजल जे लक्षद्वीपचे खासदार आहेत. यांच्याकडे तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ या राज्याची जबाबदारी असेल.

  5. नरेंद्र वर्मा यांच्याकडे मीडिया आणि आयटी डिपार्टमेंटची जबाबदारी असेल.

  6. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बिहार, छत्तसीगड आणि जम्मू-काश्मिर, कर्नाटक तसंच कामगार आणि अल्पसंख्यांक आणि ओबीसी हे पाहतील.

  7. नसीम सिद्दीकी हे नॅशनल सेक्रेटरी असतील. ज्यांच्याकडे उत्तर प्रदेश, बिहार, गोवा अशी जबाबादार काही जणांकडे देण्यात आली आहे.

अशी सविस्तर घोषणा शरद पवार यांनी यावेळी केली. त्यानंतर ते असंही म्हणाले की, ‘याशिवाय इतरही काही सहकारी आहेत ज्यांच्यावर काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, ही सर्व टीम लोकांना विश्वास देतील आणि देशात जे परिवर्तन आणायचं आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हिस्सा आहे त्यासाठी ही टीम काम करेल.’ असं पवार म्हणाले.

    follow whatsapp