Baramati Assembly election : (वसंत मोरे, बारामती) 'आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर करा', अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) कार्यकर्त्यांनी थेट शरद पवारांकडे केली. बारामतीतील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची त्यांच्या गोविंद बाग येथील घरी भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर करण्याचा हट्ट धरला.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीमुळे बारामतीची चर्चा देशभरात झाली. पहिल्यांदाच शरद पवार विरुद्ध अजित पवार असा राजकीय संघर्ष बारामतीमध्ये बघायला मिळाला. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी दिली. पण, सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. लाखाहून अधिक मताधिक्य घेत सुप्रिया सुळे विजयी झाल्या.
अजित पवारांना धक्का
बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे. अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातूनही सुप्रिया सुळे यांना ४७ हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळालेले आहे. हा निकाल अजित पवारांसाठी धक्कादायक ठरला.
विधानसभेला पवार विरुद्ध पवार लढत होणार?
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात झोकून घेतले. युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर ते विधानसभेची निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चाही सुरू झाली होती. पण, त्यावर युगेंद्र पवारांनी उत्तर देणं टाळलं.
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले असून, राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
"आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे"
बारामतीतील काही कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतली. "तुम्हाला सगळ्यांची विनंती आहे की, येत्या आमदाकीला युगेंद्र दादांना संधी मिळावी. युगेंद्र दादांमुळे आमची हिंमत झाली. दादांनी शब्द दिला होता की, मी आहे तुम्ही लढा. युगेंद्र दादांशिवाय दुसरा उमेदवार कुणीच नाहीये. दादांनाच उमेदवारी मिळावी एवढीच आमची इच्छा आहे. तुम्ही फक्त युगेंद्रदादांना ताकद द्या. आमचं दादांवर लक्ष आहे, तुम्ही लक्ष ठेवा कारण आम्हाला आता बारामतीचा दादा बदलायचा आहे", अशी भूमिका शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांनी मांडली. त्यावर आताच याची चर्चा करू नका, असे शरद पवार म्हणाले.
युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. शऱद पवारांकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवारांना तिकीट देण्यात आले, तर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच निवडणूक पाहायला मिळेल.
ADVERTISEMENT