Nitesh Rane : राज्यात 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं. 15 मार्चला या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. या संपूर्ण कार्यकाळात देवेंद्र फडणवीस सरकारचे एक मंत्री मात्र, कायम चर्चेत आहेत. ते म्हणजे मत्यव्यवसाय मंत्री नितेश राणे. नितेश राणे यांनी मागच्या काळातही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली होती, मात्र मंत्री झाल्यानंतर ते अशी वक्तव्य टाळतील अशी शक्यता वाटत होती. मात्र वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अजूनही सुरूच आहे. नागपूरमध्ये काल मोठा हिंसाचार झाला. राज्यात मागच्या काळात झालेले वादग्रस्त वक्तव्यच वातावरण ढवळून काढण्यासाठी कारणीभूत असल्याचं विरोधक म्हणत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Nagpur मध्ये अचानक का भडकली एवढी हिंसा? घटनेची A to Z स्टोरी
लव्ह जिहाद, लँड जिहाद, व्होट जिहाद अशा वेगवेगळ्या शब्दांचा उल्लेख करत नितेश राणेंनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. तर मंत्री होण्यापूर्वी त्यांनी थेट मशिदीत घुसण्याचीही भाषा केली होती.
"शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम नव्हतेच..."
"आमच्यातले काही टाळके सांगतात, शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते, हे उगाच टेपरेकॉर्डर चालवतात, स्वराज्याची लढाई हे इस्लाविरोधात होती, हिंदू-मुस्लिम लढाई होती, या लढाईत आमच्या राजाने हिंदू धर्म इस्लामसमोर झुकू दिला नाही, हा इतिहास आहे" असं नितेश राणे म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त कसबा संगमेश्वरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केलं होतं.
"केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान"
नीतेश राणे यांनी पुणे जिल्ह्यातील सासवड गावात हे वक्तव्य केलं होतं. "महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचे सरकार आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांची बहीण तिथून निवडणूक जिंकत आहेत. सर्व दहशतवादी त्याला मतदान करतात. सर्व दहशतवाद्यांचा समावेश करूनच हे लोक खासदार झाले आहेत."
"बुरखा घालून परीक्षेला बसू देऊ नका"
नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले होते, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत परीक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता दिल्याचं परिपत्रक पाहिलं. हे लांगूलचालन चालणार नाही. बुरखा घालून परीक्षेला बसल्यामुळे धोके होऊ शकतात. हे धोके लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा. परीक्षेसोबतच मतदानाच्या वेळीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. नेमके तेच विद्यार्थी परीक्षेला आहेत का? हे देखील पाहावं लागेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये. विशिष्ट धर्माचे लांगुलचालन होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. सरकारचा भाग म्हणून मी बोलतोय. असं परिपत्रक काढलं असेल तर ते तात्काळ रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली होती. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडे त्यांनी ही मागणी केली होती.
"EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला"
नितेश राणे सांगलीमध्ये बोलताना असंही म्हणाले की, मी हिंदुत्वाच्या आधारावर निवडून आलो आहे. मी दुसरीकडे गेलोच नाही. मला काही फरक पडला नाही. मला हिंदूनीच मतदान केलं, मी आमदार म्हणून निवडून आलो आणि मंत्री झालो असं राणे म्हणाले. "EVM च्या नावाने विरोधक बोंबलत आहेत, कारण त्यांना हजम होत नाहीये की, हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करतो. विरोधकांना वाटत होतं, की हिंदू समाज मतदान करायला एकत्र येऊ शकत नाही. हे EVM ला दोष देतात, पण या लोकांना EVM चा अर्थ माहितीच नाही. हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं हे विरोधकांना कळलंच नाही. EVM चा अर्थ आहे Every Vote Against Mulla. असं" नितेश राणे म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, आम्ही EVM मुळेच निवडून आलोय, हे तीन-तीन आमदार बसलेत असं नितेश राणे म्हणाले होते.
"बाबरी तोडताना विचारत बसलो नाही, आता हीच ती वेळ..."
"बाबरी मशिद तोडत असताना आपण एकमेकांना विचारत बसलो नाही. आपल्या कारसेवकांनी ते काम केलं. सरकार म्हणून त्यावेळी राज्य सरकारने योग्य ती भूमिका घेतली. त्याचीच पुनरावृत्ती करायची असेल, तर हीच ती वेळ आहे. हीच ती वेळ आहे. समजदार लोकांना इशारा काफी आहे." असं विधान यांनी औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरू असताना केलं आहे.
"मशिदीत घुसून मारू..."
रामगिरी महाराज यांना काही केलं तर तुम्हाला मशिदींमध्ये घुसून मारू असं वक्तव्य नितेश राणे यांनी मंत्री होण्यापूर्वी केलं होतं. रामगिरी महाराज यांनी मोहोम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता. त्यावेळी रामगिरी महाराज यांच्या समर्थनात बोलताना नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं होतं. अहमदनगरमधील आंदोलनात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
हे ही वाचा >> Nagpur Violence: औरंगजेबाची कबर छ. संभाजीनगरमध्ये मग नागपूर अचानक का पेटलं?
एकूणच, ही सर्व वादग्रस्त वक्तव्य राज्यातील वातावरण ढवळूण काढण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप आता नितेश राणे यांच्यावर होतोय. विशेषत: ही सर्व वक्तव्य मुस्लिम धर्मीयांशी संबंधीत असल्यानं हे जाणीवपूर्वक केलं जातंय का? असाही प्रश्न उपस्थित होतोय. नितेश राणे यांच्यासोबतच राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, अबू आझमी, सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी वाद निर्माण होतील अशी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
ADVERTISEMENT
