राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळून लावताना मित्रपक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला. आमच्या पक्षाची वकिली करण्याचा अधिकारी कुणी दिला? असा सवाल पवारांनी केला. वकिलीचा मुद्दा संजय राऊतांच्याही जिव्हारी लागल्याचं दिसलं. कारण राऊतांनी अजित पवारांवर पलटवार करत कुणाची वकिली करतो हेच सांगून टाकलं.
ADVERTISEMENT
झालं असं की, अजित पवार भाजपसोबत जाणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यावर अजित पवारांनाच खुलासा करावा लागला. या चर्चांवर अजित पवारांनी पडदा टाकला, पण त्याचवेळी शरद पवारांच्या हवाल्यानं राष्ट्रवादीतील आमदार भाजपसोबत जाणार असल्याचं रोखठोकमध्ये लिहिणाऱ्या संजय राऊतांना चांगलं सुनावलं.
हेही वाचा >> अजित पवारांच्या न झालेल्या बंडाची Inside Story!आठवड्यात नेमकं काय घडलं?
अजित पवार म्हणाले होते की, “आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करत असतील. मी माझ्या पक्षाबद्दल म्हणत नाही. माझ्या पक्षात माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही. परंतु पक्षाबाहेरचे. आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते ते आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक? पक्षाची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी मी विचारणार आहे.”
अजित पवार इतक्यावरच थांबले नाहीत, तर ते पुढे असंही म्हणाले की, “तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं मुख्यपत्र आहे, त्याबद्दल बोला. पण, तुम्ही आम्हाला कोट करून… ते असं झालं, तसं झालं… आम्ही आमची स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत.”
हेही वाचा >> अजित पवारांचा भांडाफोड शरद पवारांनीच केला? वागळे काय म्हणाले?
“आमचं वकीलपत्र दुसऱ्या कुणी घेण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांची त्यांची भूमिका मांडावी. आमची भूमिका मांडण्यासाठी आमच्या पक्षाचा प्रवक्ता, आमच्या पक्षाचे नेते मग राष्ट्रीय स्तरावरचे असतील किंवा राज्य स्तरावरील असतील, हे त्याबाबतीत मजबूत आहे”, अशा तिखट शब्दात अजित पवारांनी खासदार संजय राऊत यांनी सुनावलं आहे.
“माझ्यावरती खापर का फोडताहेत, मी मविआची…”, संजय राऊतांचा पलटवार
अजित पवारांच्या वकिलीच्या टीकेला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “माझ्यावरती खापर का फोडताहेत? मी महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून? मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. माझ्यावर खापर का फोडताहेत आणि फोडण्याचं कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली, तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात. आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की, आपल्याबरोबरचा प्रत्येक घटकपक्ष हा मजबूत राहावा. त्याचे लचके तोडले जाऊ नयेत, ही आमची भूमिका असेल आणि त्यासाठी आमच्यावर कुणी खापर फोडत असेल, तर जरा गंमत आहे”, असं उत्तर संजय राऊतांनी अजित पवारांना दिलं.
ADVERTISEMENT