शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं, तर शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात. केसरकरांच्या याच सल्ल्यावरून खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाबद्दल मोठं विधान केलं. शिंदे गटातील हालचालींचा हवाला देत राऊतांनी शिंदे गटातील लोक भाजपमध्ये विलीन करून घेतील, असं म्हटलंय.
ADVERTISEMENT
मुंबईत खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानाबद्दल राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “आत्मपरीक्षण कुणी करायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच शिवसेना आहे. गद्दार आम्हाला आत्मपरीक्षण करायला सांगत असतील, तर कठीण आहे.”
“या राज्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे की, जे गद्दार आहेत. जे सोडून गेलेत, त्यांना परत विधानसभेत किंवा लोकसभेत पाठवायचं नाही. आत्मपरीक्षणाची अजिबात गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जोमाने वाढत आहे”, असा दावा संजय राऊतांनी बोलताना केला.
सत्तारांचं विधान, संजय राऊत म्हणाले दुसरा पर्याय नाही
शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तारांनी केलेल्या विधानाचा हवाला देत संजय राऊतांनी शिंदे गटातील लोक भाजपत जाणार असल्याचं म्हटलंय. “दोन्ही गट एकत्र यावेत असं दीपक केसरकरांना वाटतंय, याचा अर्थ त्यांनी आत्मपरीक्षण केलंय. त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडतंय. म्हणजे त्यांच्या गटामध्ये अजून काही गट तयार झाले आहेत. तिथं टोळीयुद्ध सुरू आहे, ही आमची माहिती आहे”, असा दावा राऊतांनी केला.
“कालच अब्दुल सत्तारांचं ऐकलं असेल. माझ्या गटातील लोक करेक्ट कार्यक्रम करताहेत, असं ते म्हणाले. यावरून तुम्ही समजून घ्या. काय घालमेल सुरूये. हालचाली सुरूये, कसे वाद सुरूये. मी वारंवार सांगतोय, हे सरकार टिकणार नाही. हा गटही टिकणार नाही. यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाजपमध्ये स्वतःला विलीन करून घेतील. तेच त्यांचं अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना शिवसेना स्वीकारणार नाही आणि दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही”, असं संजय राऊत शिंदे गटाबद्दल म्हणाले आहेत.
भाजपचं मिशन 144 : राऊत म्हणाले, ‘शिंदे गटाची माणसं धुणी भांडी करायला ठेवणार का?’
लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपनं 144 जागा निश्चित केल्या आहेत. यात शिंदे गटाकडे असणाऱ्या मतदारसंघातही भाजपनं निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलीये. याबद्दल राऊत म्हणाले, “भाजपच्या मिशनमध्ये शिंदे गट कुठे आहे. शिंदे गटाची माणसं आहेत, त्यांना काय धुणी भांडी करायला ठेवणार आहेत का? याचा अर्थ भाजपच्या पायरीवरही यांना कुणी उभं करत नाहीत. ही तात्पुरती तडजोड आहे.”
ADVERTISEMENT