‘हरवले आहेत…! Missing’, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना संजय राऊतांनी दोन्ही मंत्र्यांवर हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपनेही प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. यात संजय राऊत म्हणतात, “चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई अशा दोन मंत्र्यांची सीमा भागासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. या भागातील मराठी जनता आपल्या अस्तित्वाची लढाई एकाकी लढत असताना हे दोन जबाबदार मंत्री सीमा भागात फिरकले देखील नाहीत. इतिहासात याची नोंद राहील. Shame!Shame!! मराठी माणसांचे गद्दार. दुसरे काय?”, असा सवाल राऊतांनी केला आहे.
राऊतांनी शेअर केलेल्या पोस्टरवर काय?
खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचे फोटो आहेत. फोटोखाली महाराष्ट्र-कर्नाटक समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील (भाजप) आणि महाराष्ट्र-कर्नाटक समन्वयक मंत्री शंभूराज देसाई (शिंदे गट) असं लिहिलेलं आहे.
हेही वाचा >> ‘शिंदेंची 33 देशात गद्दार म्हणून ओळख…’ बारसूमध्ये उद्धव ठाकरे बरसले
पुढे म्हटलेलं आहे की, सीमाभागात मराठी जनता संयुक्त महाराष्ट्रासाठी एकाकी लढत असताना त्यांना साथ द्यायचं सोडून हे कोणत्या बिळात लपून बसले आहेत, हे त्यांचे त्यांनाच ठावूक, असा टोला या लगावला आहे.
भाजपचा संजय राऊतांवर पलटवार
संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांना लक्ष्य केल्यानंतर भाजपनंही पलटवार केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा >> ‘कात्रजचा घाट’ अन् छत्रपती शिवाजी महाराजांचं कनेक्शन; काय आहे इतिहास?
“ज्या मुंबईकरांनी भरभरून दिल त्यांची फसवणूक करणे. ज्या कोकणवासीयांनी प्रेम केल त्यांना रोजगारापासून वंचित ठेवणे. ज्या महाराष्ट्राने युतीला मतदान केले त्यांचा विश्वासघात करणे यासाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत जबाबदार होते अशा नोंदी झाल्या आहेत इतिहासांत”, असं प्रत्युत्तर केशव उपाध्ये यांनी दिलं.
कर्नाटक विधानसभा निवडणूक अन् सीमावाद
कर्नाटकात सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. प्रचारामुळे राजकीय पारा तापला असून, महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी या उमेदवारांच्या प्रचारासाठी यावे, असं आवाहन या समितीने केलेलं आहे. त्याच अनुषंगाने संजय राऊतांनी हे ट्विट केलेलं आहे.
ADVERTISEMENT