Sanjay Raut Vs Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथील कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली. 2019 मध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेत ठाकरेंनी बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे मान्य केले होते, असा दावा शाह यांनी केला. त्याचबरोबर ठाकरेंनाही काही सवालही केले. अमित शाह यांच्या या भाषणावर संजय राऊत यांनी खोचक शब्दात भाष्य केले आहे. “गृहमंत्री अमित शाह यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका, मजेशीर आहे”, असं म्हणत राऊतांनी शाहांना डिवचलं आहे. (Maharashtra Politics news)
ADVERTISEMENT
नांदेडमधील अमित शाह यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ संजय राऊतांनी रिट्विट केला आहे. त्याचबरोबर त्यांनी मतही मांडलं आहे. राऊत यांनी म्हटलं आहे, “गृहमंत्री अमित शाह यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे. मला प्रश्न पडला आहे, हे भाजपाचे महासंपर्क अभियान होते की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे खास आयोजन.”
हेही वाचा >> भाजपचा 2024 साठी काय आहे ‘घर वापसी’ प्लान?
“अमित भाई यांच्या भाषणातील 20 मिनिटांत 7 मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्रीचा धसका कायम. शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्यबाण गद्दार गटास लबाडी करून दिले, तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है. जे प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले, त्यावर खरे तर भाजपने त्यावर चिंतन करायला हवे. पण, ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय”, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
अमित शाह नांदेडच्या सभेत काय म्हणाले?
नांदेडच्या सभेत अमित शाह म्हणाले, “आता देंवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार बनलं आहे. भाजप-शिवसेनेचे सरकार बनलं आहे. धनुष्यबाणही शिवसेनेला मिळाला आणि हे निश्चित झालं की, कोणती शिवसेना खरी आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यासाठी आलोय की, मी भाजपचा अध्यक्ष होतो. मी आणि देवेंद्र फडणवीस बोलणी करण्यासाठी गेलो होतो.”
हेही वाचा >> संजय राऊत म्हणाले शिवसेना शाहांनी फोडली, गृहमंत्री म्हणाले सेना तर…
याच मुद्द्यावर शाह यांनी सांगितलं की, “उद्धव ठाकरेंनी हे स्वीकारलं होतं की, बहुमत एनडीएला मिळालं तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. जेव्हा निकाल लागले, तेव्हा त्यांनी वचन तोडलं आणि सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर बसले.”
शाहांनी उद्धव ठाकरेंना केले सवाल
“मी उद्धव ठाकरेंना विचारतोय की, उद्धवजी, हिंमत असेल, तर तुमची भूमिका स्पष्ट करा. तिहेरी तलाक हटवला, राम मंदिर बनतंय, समान नागरी कायदा हवा की नाही, मुस्लिमांना आरक्षण असायला हवं की नाही, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही. कर्नाटकात ज्यांचं सरकार आलं आहे, ते सावरकरांना अभ्यासक्रमातून हटवू पाहत आहे, तुम्ही भूमिका स्पष्ट करा. तुम्ही दोन नावांमध्ये पाय ठेवू शकत नाही”, असं आव्हान अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
ADVERTISEMENT