Unmesh Patil : "या पापाचे वाटेकरी होता कामा नये", पाटलांनी भाजप का सोडली?

मुस्तफा शेख

03 Apr 2024 (अपडेटेड: 03 Apr 2024, 01:34 PM)

Unmesh Patil Joined Shiv Sena UBT :

उन्मेष पाटील यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

follow google news

Unmesh Patil Shiv Sena UBT : खासदारकीचा राजीनामा देत भाजपचे नेते उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. तिकीट कापल्यामुळे पाटलांनी भाजप सोडली, अशी चर्चा केली जात आहे. पण, भाजपतून बाहेर पडण्याचं उन्मेष पाटलांनी वेगळं कारण सांगितलं. 

हे वाचलं का?

मुंबईतील मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश करताना उन्मेष पाटील म्हणाले की, "आज अनेकजण प्रश्न विचारताहेत की, उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालात का? राजकारण करत असताना आमदार, खासदार होणं, हे कधीही साध्य नव्हतं. साधन म्हणून काम करत होतो."

"आमदार म्हणून काम करत असताना शासकीय योजनांची जी जत्रा आता सुरू आहे, तो पॅटर्न मी राबवला. मनरेगातून सर्वाधिक गायगोठे देण्याचा पॅटर्न चाळीसगावमध्ये रावबला. पण, दुर्दैवाने विकासाची त्याठिकाणी किंमत नाही. पॉलिसी मेकर भूमिका निभावणाऱ्यांची त्याठिकाणी किंमत नाही."

विधानसभेची तयारी करत असताना लोकसभेची उमेदवारी

"चाळीसगावमध्ये चांगली बांधणी करत असताना मी इच्छा प्रगट केलेली नसताना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. मला प्रेशर केलं म्हणून कार्यकर्ता म्हणून मी ती भूमिका स्वीकारली. एकतर विधानसभेची बांधणी करत असताना जबाबदारी दिली मग लोकसभेसाठी काम करू लागलो."

"ग्रामीण महाराष्ट्रात ४ लाख १८ हजार मतांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून... मी युतीचा खासदार आहे. एका भावाने दगा दिला असला तरी दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे, याचा मला आनंद आहे. त्यावेळी भाजपच्या सोबत शिवसेना पाठिमागे उभी राहिली आणि ४ लाख १८ हजार मतांनी निवडून आलो."

"प्रामाणिकपणे जनता आणि सरकारमधील दुवा म्हणून काम केले. सगळ्यात महत्त्वाचं की, मला बदला घेण्यासाठी हे पद नाही मिळालं, तर बदल घडवण्यासाठी हे पद मिळालं या भावनेने काम केलं. पण, दुर्दैवाने हे बदल्याचे राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रास देणारं होतं. सूडाचं राजकारण आणि मला व तरुणाईला हवंय बदलाचं राजकारण."

"कार्यकर्त्यांच्या वेदनांबद्दल आवाज उठवला. प्रसंगी काही नेत्यांना वेदना झाल्या. ते म्हणाले की, तू संघर्ष या पातळीवर देऊ नको. शेकडो कोटी रुपये शेतकऱ्यांना पीकविम्याचे मिळत असतील तर तिथे मी का संघर्ष करायला नको?"

भाजप सोडण्याचे काय सांगितले कारण?

"मी गिरणा परिक्रमा केली. पायी फिरलो. मला कौतुक थाप नको होती. गिरणामाईची तहान भागवता येईल का? पण, तो प्रश्न सोडवला गेला नाही, तर त्याची खिल्ली उडवली गेली. मला मान सन्मान नको पण ज्या पद्धतीने अवहेलना करण्यात आली. कार्यकर्त्याची घुसमट होते."

"बदल करण्याऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते, ती महाराष्ट्रासाठी घातक आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण या पापाचे वाटेकरी होता कामा नये. आपण बदल्याच्या भावनेने जे राजकारण रुजवले जात आहे, त्याचे वारकरी होता कामा नये. मान सन्मान नको, पण स्वाभिमान जपला जात नसेल... बैठकीला न बोलवणं, अवमान करणं. चुकीच्या बातम्या देणं... अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे मी ठरवलं की, स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाच्या लढाईत सहभागी होण्याचे ठरवलं."

    follow whatsapp