शरद पवारांनी 24 तासांतच नवा गुगली टाकलाय. त्यामुळेच पवार भाकरी उलटी फिरवणार का? अशा चर्चा सुरू झाल्यात. शरद पवारांसाठी आणि राष्ट्रवादीचं भवितव्य ठरवण्यासाठी 5 मे ही महत्त्वाची तारीख आहे. पण त्याआधीच पवारांचं हे विधान समोर आल्यानं मोठा ट्विस्ट आलाय. पवार नेमकं काय म्हणाले, आणि त्याचा अर्थ काय आणि पवार कोणत्या परिस्थितीत भाकरी उलटी फिरवू शकतात, म्हणजेच निर्णय मागे घेऊ शकतात, हेच समजून घेऊ…
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र दिनाच्या दुसऱ्याच दिवशी 2 मे रोजी देशाच्या राजकारणात भूकंप घडवला. 24 वर्षांपूर्वी मोठ्या संघर्षातून ज्या पक्षाची स्थापना केली, त्याच पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. याच घोषणेनं निव्वळ राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही, तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही बुचकळ्यात टाकलं. तसंच योग्य तो परिणाम साधल्यावर, पवार निर्णय मागे घेणार का? याची देशभर चर्चा सुरू झालीये.
याच पार्श्वभूमीवर शरद पवारांचं एक विधान समोर आलंय. बुधवारी 3 मे रोजी पदत्यागाच्या घोषणेमुळे नाराज, भावूक झालेल्या तरुण कार्यकर्त्यांची शरद पवारांनी भेट घेतली. संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घ्या, अशी आग्रही मागणी केली. तसंच आपल्याला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता, असंही या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं, अशी माहिती या सर्व घडामोडींशी संबंधित सुत्रांनी ‘मुंबई Tak’ला दिली.
यावरच शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं, ‘मी वरिष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. पण मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. माझा निर्णय झालाय. आता समिती जो निर्णय घेईल. तो मला मान्य असेल’, असंही पवार सांगायला विसरले नाहीत.
पवारांनी कार्यकर्त्यांच्या आग्रही भुमिकेनंतर एक पाऊल मागे घेतल्याचं म्हटलं जातंय. पवारांनी आपला वारसदार निवडण्यासाठी 18 नेत्यांची समिती नेमलीय. याच समितीची शुक्रवारी ५ मेला यशवंतराव चव्हाण सेंटर इथं बैठक होणार आहे. ही समितीच अंतिम निर्णय घेईल आणि तो निर्णय आपल्यालाही मान्य असेल, असं पवारांनी स्पष्ट केलं.
शरद पवारांच्या विधानामुळे दोन गुंते
त्यावरूनच आता समितीनं सांगितलं, तर पवार आपला पदत्यागाचा निर्णयही मागे घेतील, असं म्हटलं जातंय. पवारांच्या घोषणेनंतर दोन गुंते निर्माण झालेत.
१) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसऱ्या फळीत मातब्बर नेतेमंडळी आहेत. पवारांकडे बघून ही मंडळी राष्ट्रवादीत आली. त्यामुळे पवारच प्रमुख नसतील, तर पक्षात कशासाठी राहायचं, असा प्रश्न निर्माण झालाय.
२) दुसरी गोष्ट म्हणजे, पक्ष म्हणजे निव्वळ पवार कुटुंब असेल, तर पवार कुटुंबातल्या व्यक्तिच्या नेतृत्वात आम्ही का काम करायचं, असा प्रश्नही समोर आलाय.
हे दोन गुंते सोडवण्यासाठी समितीकडून २०२४ च्या निवडणुकीनंतर पदत्यागाचा निर्णय घ्यावा, असा मध्यममार्गी प्रस्ताव पवारांना दिला जाऊ शकतो. आणि जवळपास ६० वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले पवार तो प्रस्तावही स्वीकारतील, असं म्हटलं जातंय.
पण पवारांच्या या गुगलीचा नेमका अर्थ काय हे आपल्याला शुक्रवारी होणाऱ्या बैठकीनंतरच कळेल. सध्याच्या घडीला मात्र त्याचा अर्थ पवारांनी आपली भूमिका काही लवचिक केलीय, असाच काढला जातोय.
ADVERTISEMENT