शिखर धवनच्या नेतृत्वाखाली जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाला NCA चा संचालक राहुल द्रविड मार्गदर्शन करणार आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा हा पहिलाच दौरा असणार आहे. राहुल द्रविडसोबतच मुंबईचा माजी क्रिकेटपटू पारस म्हांब्रे देखील टीम इंडियाला मार्गदर्शन करणार आहे. बीसीसीआयने पारस म्हांब्रे आणि टी. दिलीप यांची श्रीलंका दौऱ्यासाठी सहायक प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे.
ADVERTISEMENT
४८ वर्षीय पारस म्हांब्रे यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं नेतृत्व केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून पारस म्हांब्रे प्रशिक्षण देत आहेत. २०१५-१६ च्या हंगामात पारस म्हांब्रे भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे बॉलिंग कोच होते. भारत अ आणि १९ वर्षाखालील संघाला मार्गदर्शन करण्यात पारस म्हांब्रे यांचा मोलाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पारस म्हांब्रेंना फारसं यश मिळवता आलं नसलं तरीही स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी ही वाखणण्याजोगी होती.
Ind vs SL : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात संधी, जाणून घ्या त्याची आतापर्यंतची कामगिरी
१९९३-९४ च्या मोसमात म्हांब्रे यांनी मुंबईकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच मोसमात म्हांब्रे यांनी ३० विकेट घेतल्या होत्या. रणजी क्रिकेटमध्ये म्हांब्रेंच्या नावावर २८४ विकेट जमा आहेत. तसेच मधल्या फळीत म्हांब्रे उपयुक्त फलंदाजीही करायचे. म्हांब्रे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा रणजी करंडक जिंकला आहे. २००२-०३ मध्ये मुंबईला रणजी करंडक जिंकवून दिल्यानंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि ते प्रशिक्षणाकडे वळले. त्यामुळे टीम इंडियाला म्हांब्रे कसं मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
BCCI ने श्रीलंका दौऱ्यासाठी केली टीम घोषित, कॅप्टन असणार ‘हा’ खेळाडू
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली २० सदस्यीय भारतीय संघ १४ जूनपासून मुंबईत क्वारंटाइन होणार आहे. यानंतर १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर २७ जूनला भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होईल. श्रीलंकेत पोहचल्यानंतर भारतीय संघाला ३ दिवस कठोर तर पुढील ३ दिवस सौम्य नियमांसह क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडही श्रीलंकेत क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर लगेच सराव सुरु करण्याच्या विचारात आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने भारतीय संघासाठी सराव सामन्याचंही आयोजन केलंय.
ADVERTISEMENT