लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडवर दणक्यात मात करुन मालिकेत आघाडी घेतलेल्या भारतीय संघाचं विमान लगेच जमिनीवर आलं. लीड्स कसोटीत इंग्लंडने भारतावर डावाने मात करत पराभवाचा वचपा काढला आणि मालिकेत बरोबरी साधली. पहिल्या डावात भारताचा संघ १०० धावांच्या आत गारद झाला. तर दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजी इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर कोलमडली.
ADVERTISEMENT
त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्याआधी विराट कोहलीने भारतीय संघात बदल करण्याची मागणी सोशल मीडियावर फॅन्सकडून आणि काही माजी खेळाडूंकडून होताना दिसत आहे. भारतीय संघातील खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता विराटसमोर संघात बदल करण्यासाठी कोणते ३ पर्याय शिल्लक राहतात हे पाहूया…
१) अजिंक्य रहाणेच्या जागेवर हनुमा विहारी –
वर्षाच्या सुरुवातीला अजिंक्यवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. ऑस्ट्रेलियात तरुण खेळाडूंना सोबघ घेत अजिंक्यने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. परंतू यानंतर दुर्दैवाने अजिंक्यच्या कामगिरीत सातत्याचा अभाव प्रकर्षाने जाणवून येतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न कसोटीत शतक झळकावल्यानंतर अजिंक्यने उर्वरित सामन्यांमध्ये २१.०५ च्या सरासरीने फक्त ३५८ धावा काढल्या आहेत.
इंग्लंडमध्ये रहाणेने खेळलेल्या ४ टेस्ट मॅचचा विचार केला असता (वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप धरुन) त्याने फक्त १५९ रन्स काढल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्षणी संघाला अजिंक्य रहाणेची गरज असते तिकडे अजिंक्य आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना दिसत नाही. इंग्लंड दौऱ्यात गोलंदाजांनी रहाणेच्या कमकुवत बाजूचा अभ्यास करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढलं, जे पाहणं खूप दुर्दैवी होतं.
२) इशांत शर्माला विश्रांती देऊन शार्दुल ठाकूरला संधी –
इशांत शर्माने प्रदीर्घ काळ भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे यात काही वाद नाही. १०० कसोटी सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेला इशांत शर्मा संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. परंतू गेल्या काही वर्षांमधला फिटनेस इश्यू लक्षात घेता त्याचं संघातलं स्थान थोडसं डळमळीत झालेलं दिसतंय. महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या वेळी भारताच्या तळातल्या खेळाडूंकडून जेव्हा फलंदाजीची अपेक्षा असते तिकडे इशांत शर्मावर विश्वास ठेवता येत नाही. याउलट दुसरीकडे शार्दुल ठाकूर हा तुलनेने अजुन तरुण आहे.
त्याच्याकडे बॉल स्विंग करायची असलेली ताकद आणि अखेरच्या फळीतल आक्रमक फटकेबाजी करण्याची कला या जोरावर शार्दुल ठाकूरचा पुढील कसोटी सामन्यासाठी विचार केला जाऊ शकतो.
३) जाडेजाऐवजी रविचंद्रन आश्विनला संधी –
पहिल्या ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय टीम मॅनेजमेंटने आश्विनऐवजी रविंद्र जाडेजाला संघात संधी दिली. फलंदाजी, गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण या अष्टपैलू कामगिरीमुळे जाडेजाला संघात स्थान देण्यात आलं आणि त्याने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनंही करुन दाखवलं. रविंद्र जाडेजाने बॅटींगमध्ये कमाल केलेली असली तरीही तिसऱ्या टेस्टचा अपवाद वगळता त्याला बॉलिंगमध्ये यश मिळालेलं नाही. स्पिनर्स हे भारताची नेहमी जमेची बाजू राहिलेले आहेत. ओव्हलची खेळपट्टी पाहता तिकडे बॉल वळण्यापासून ते अचानक बाऊन्स होण्याची संधी असते. अशावेळी टीम इंडिया काहीशी संकटात सापडलेली असताना जाडेजाऐवजी आश्विनला संधी देण्याचा विचार करता येऊ शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये आश्विनच्या नावावर १८ विकेट जमा आहेत. ज्याचा फायदा टीम इंडियाला उर्वरित दोन टेस्ट मॅचमध्ये नक्कीच होऊ शकतो.
ADVERTISEMENT