IPL 2021 Explainer : खेळ महत्वाचा की जीव, जाणून घ्या खेळाडू स्पर्धेतून का घेत आहेत माघार?

मुंबई तक

• 11:47 AM • 26 Apr 2021

सध्याच्या घडीला भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती आपल्याला नवीन नाहीये. प्रत्येक दिवशी आपण रुग्णसंख्येत होणारी वाढ, ऑक्सिजनची कमतरता, इंजेक्शनचा तुडवडा अशा अनेक बातम्या पाहत आहोत. भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फटका आता आयपीएललाही बसायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ज्यात राजस्थान रॉयल्सचा अँड्रू टाय, चेन्नईचा जोश हेजलवूड, दिल्ली […]

Mumbaitak
follow google news

सध्याच्या घडीला भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती आपल्याला नवीन नाहीये. प्रत्येक दिवशी आपण रुग्णसंख्येत होणारी वाढ, ऑक्सिजनची कमतरता, इंजेक्शनचा तुडवडा अशा अनेक बातम्या पाहत आहोत. भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फटका आता आयपीएललाही बसायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ज्यात राजस्थान रॉयल्सचा अँड्रू टाय, चेन्नईचा जोश हेजलवूड, दिल्ली कॅपिटल्सचा रविचंद्रन आश्विन आणि RCB च्या केन रिचर्डसन आणि अॅडम झॅम्पा यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

२९ एप्रिलपासून भारतात आयपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात झाली. भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने ही स्पर्धा प्रेक्षकांविना आणि बायो सिक्युअर बबलमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू देशातलं सध्याचं कोरोनामुळे निर्माण झालेलं वातावरण पाहता यंदाच्या हंगामाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. मग असं नेमकं झालं तरी काय की खेळाडू अचानक स्पर्धेतून माघार घेत आहेत?

परंतू या गोष्टीत एक मुद्दा महत्वाचा ठरतो तो म्हणजे भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आयपीएलचं आयोजन करणं योग्य आहे का? काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकिपर अॅडम गिलख्रिस्टने भारतातल्या कोरोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आयपीएल खेळवण्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

बायो सिक्युअर बबल ठरतंय कळीचा मुद्दा –

खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी तयार केलेलं बायो सिक्युअर बबल हा या प्रकरणात सर्वात कळीचा मुद्दा ठरतोय. बीसीसीआय खेळाडूंना हॉटेलमध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देतंय…खेळाडूंना आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन यायची परवानगीही मिळाली आहे. पण टीम मिटींग, लंच-डिनर आणि प्रॅक्टिसचा कालावधी सोडला तर संपूर्ण काळ हे प्लेअर्स आपल्या हॉटेलच्या रुममध्येच असतात.

त्यातच बीसीसीआयच्या नवीन नियमांप्रमाणे यंदा अंतिम ११ मध्ये खेळणाऱ्या प्लेअर्सव्यतिरीक्त ५ अतिरिक्त प्लेअर्सनाच मैदानात प्रवेश मिळतो. त्यामुळे ज्या खेळाडूंना संघात संधी मिळत नाही त्यांचा बहुतांश काळ हा हॉटेलच्या रुममध्येच जातो आहे. याच कारणामुळे बऱ्याचश्या खेळाडूंमध्ये बेचैनी वाढताना दिसत आहे. एकीकडे भारतात कोरोनामुळे बिघडत असलेली परिस्थिती आणि दुसरीकडे संघात खेळायला मिळेल की नाही याबद्दल शाश्वती नसणं यामुळे अनेक खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट बोर्डाकडून आणि परिवाराकडून घरी परतण्याबद्दल प्रेशर आहे. राजस्थान रॉयल्सच्या अँड्रू टायने याच कारणामुळे माघार घेतल्याचं बोललं जातंय.

ऑस्ट्रेलिया-इंग्लंडच्या प्लेअर्सवर अधिक प्रेशर –

माघार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये विशेषकरुन ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आघाडीवर आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आखून दिलेल्या नियमांमुळे बहुतांश खेळाडूंचा जास्तीत जास्त काळ हा हॉटेलच्या रुममध्ये जातोय, त्यामुळे जर खेळण्याची संधी मिळणार नसेल तर घरी परत या असं प्रेशर खेळाडूंवर आहे. त्यामुळे जर संधी मिळणार नसेल तर हॉटेलच्या रुमवर बसून राहण्यापेक्षा घरी गेलेलं कधीही चांगलं ही भावना प्लेअर्समध्ये तयार व्हायला लागली आहे. याआधी आयपीएलमध्ये अनेकदा खेळाडूंनी लागोपाठ सामने खेळले आहेत. परंतू त्यावेळी खेळाडूंना हॉटेलबाहेरुन पडून थोडावेळ फेरफटका मारुन यायची परवानगी होती. परंतू सध्याच्या परिस्थितीत खेळाडूंना ही परवानगी नाहीये. त्यामुळे सराव आणि टीम मिटींग झाली की खेळाडूंना आपला संपूर्ण वेळ रुममध्येच काढावा लागतो. अशावेळी अनेकांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो.

त्यातच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने भारतातून येणाऱ्या हवाई वाहतूकीवर काही निर्बंध घातले आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याआधीच स्पर्धेतून माघार घेण्याची मानसिकता खेळाडूंमध्ये तयार होताना दिसत आहे. बीसीसीआयने अद्याप खेळाडूंच्या माघार सत्रावर प्रतिक्रीया दिलेली नसली तरीही राजस्थान रॉयल्स संघाशी निगडीत असलेल्या एका सूत्राने खेळाडूंमध्ये वाढत असलेल्या बेचैनीबद्दल माहिती दिली.

इतर देशांच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया आणि काही प्रमाणात इंग्लंडचे खेळाडू अशा पद्धतीने माघार घेण्याबाबत उघड भूमिका घेतायत याला कारण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही क्रिकेट बोर्डांची आर्थिक बाजू ही तुल्यबळ आहे. त्यामुळे हे दोन्ही बोर्ड आपल्या खेळाडूंना माघार घ्यायला लावू शकतात. म्हणूनच जोश हेजलवू़डने स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच बायो सिक्युअर बबलचं कारण देत माघार घेतली होती. परंतू दुर्दैवाने इतर देशांच्या बोर्डाबद्दल अशी परिस्थिती नाही. आयपीएल हे अनेक क्रिकेट बोर्डांसाठी कमाईचं साधन आहे. म्हणूनच न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान यासारख्या देशातले खेळाडू आपल्याला आयपीएलमधग्ये खेळताना दिसतायत.

आतापर्यंत जिथे फक्त परदेशी खेळाडू हे माघार घेत होते तिकडे रविचंद्रन आश्विननेही माघार घेतली. माझा परिवार कोरोनाविरुद्ध लढा देत असताना मला त्यांच्यासोबत राहणं गरजेचं असल्याचं आश्विनने सांगितलं. आश्विनच्या माघार घेण्यामुळे भारतीय खेळाडूंमध्येही थोडसं बेचैनीचं वातावरण तयार झालंय हे स्पष्ट होतंय. म्हणालया गेलं तर बीसीसीआय आपल्या सर्व खेळाडूंची उत्तम काळजी घेतंय, हॉटेल रुम आणि बायो बबलमध्ये खेळाडूंसाठी उत्तम सोयी-सुविधा आहेत. परंतू सध्याची परिस्थिती लक्षात घेता कितीही सुविधा मिळत असल्या तरीही हे बायो बबल एखाद्या जेलप्रमाणेच आहे…त्यातच मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर परिस्थिती आणखी बिघडली तर आणखी काही खेळाडूही माघार घेऊ शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळात बीसीसीआय या प्रश्नाकडे कसं पाहतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp