आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला अद्याप आपला पहिला विजय नोंदवता आलेला नाहीये. सलग दुसऱ्या सामन्यात द्विशतकी धावसंख्या उभारुनही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनऊ सुपरजाएंट संघाने २११ धावांचं आव्हान ३ विकेट राखून पूर्ण करत यंदाच्या हंगामातला पहिला विजय नोंदवला. एका क्षणासाठी चेन्नईचा संघ हा सामना सहज जिंकेल असं चित्र निर्माण झालं होतं. परंतू अखेरच्या ओव्हर्समध्ये केलेला स्वैर मारा आणि ढिसाळ फिल्डींगमुळे लखनऊचं काम सोपं झालं.
ADVERTISEMENT
पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जने आश्वासक सुरुवात केली. आक्रमक पवित्रा घेतलेल्या रॉबिन उथप्पाने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये सुरेख फटकेबाजी करत लखनऊच्या गोलंदाजांवर दडपण आणलं. परंतू एक रन घेताना झालेल्या गोंधळामुळे ऋतुराज गायकवाड रनआऊट झाला. परंतू यानंतर आलेल्या चेन्नईच्या प्रत्येक फलंदाजाने महत्वपूर्ण इनिंग खेळत संघाची बाजू वरचढ राहील याची काळजी घेतली.
मोईन अली, रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, अंबाती रायुडू, रविंद्र जाडेजा आणि धोनी यांनी फटकेबाजी करुन संघाला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. लखनऊकडून आवेश खान, अँड्रू टाय आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने ४९ तर मोईन अलीने ३५ धावांची खेळी केली.
२११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊच्या संघाने चांगली सुरुवात केली. कर्णधार लोकेश राहुल आणि क्विंटन डी-कॉक यांनी फटकेबाजी करत ९९ धावांची भागीदारी केली. प्रिटोरीयसने राहुलला ४० धावांवर आऊट करत लखनऊला पहिला धक्का दिला. यानंतर आलेला मनिष पांडेही मुंबईकर तुषार देशपांडेच्या जाळ्यात अडकला. क्विंटन डी-कॉकने आपलं अर्धशतक पूर्ण करत चेन्नईच्या गोलंदाजांना चांगली झुंज दिली. परंतू प्रिटोरियसच्या बॉलिंगवर तो देखील आऊट झाला. डी-कॉकने ४५ बॉलमध्ये ९ चौकार लगावत ६१ धावांची खेळी केली.
यानंतर एविन लुईस आणि दीपक हुडाने अखेरच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत विजयासाठी आवश्यक असलेलं आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतू ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात दीपक हुडा सीमारेषेवर रविंद्र जाडेजाच्या हातात कॅच देऊन माघारी परतला. अखेरच्या दोन ओव्हर्समध्ये लखनऊला विजयासाठी ३३ धावांचं आव्हान होतं. परंतू नवोदीत आयुष बदानी आणि एविन लुईसने शिवम दुबेच्या १९ व्या षटकात फटकेबाजी करत लखनऊला विजयासाठी ९ धावांचं आव्हान आणून ठेवलं.
दडपणाखाली आलेल्या शिवम दुबेचा लुईस आणि बदानीने पुरेपूर फायदा घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली.
IPL 2022 : मुंबई इंडियन्सला दहा हत्तींचं बळ, सूर्यकुमार यादव संघात दाखल
युवा मुकेश चौधरीला चेन्नईकडून शेवटची ओव्हर टाकण्याची संधी मिळाली. परंतू पहिले दोन बॉल वाईड बॉल टाकत मुकेश चौधरीने आपण दबावात असल्याचं दाखवून दिलं. यानंतर आयुष बदोनीने खणखणीत षटकार खेचत स्कोअर लेव्हलवर आणला. यानंतर उर्वरित एक धाव पूर्ण करत लखनऊने चेन्नईच्या हातातला विजय हिसकावून घेत यंदाच्या हंगामातला आपला पहिला विजय नोंदवला. एविन लुईसने २३ बॉलमध्ये ६ फोर आणि ३ सिक्स लगावत नाबाद ५५ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लगावला.
ADVERTISEMENT