Nilesh Ghaiwal: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर जीवघेणा हल्ला, तेही कुस्तीच्या फडात!
Nilesh Ghaiwal: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर धाराशिव येथील एका जत्रेतील कुस्तीच्या मैदानातच जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला एका कुस्तीपटूकडून करण्यात आला.
ADVERTISEMENT

गणेश जाधव, धाराशिव: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर कुस्तीच्या मैदानात थेट हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित् कुस्तीचा फड आयोजित करण्यात आला होता. याच ठिकाणी निलेश घायवळ पहिलवानांना भेटण्यासाठी उपस्थित होता. जिथे त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कुस्ती सुरू असतानाच अचानक एक कुस्तीपटू धावत आला अन् त्याने निलेश घायवळवर हल्ला चढवला. हा हल्ला एवढा अनपेक्षित होता की, सुरुवातीचे काही क्षण नेमकं काय झालं हे कुणालाही समजलं.
हे ही वाचा>> 26/11: जीवाची पर्वा न करता कसाबला भिडले, आता तहव्वूर राणाला परत आणलं, जिगरबाज सदानंद दाते आहेत तरी कोण?
गर्दीचा फायदा घेत कुस्तीपटूने निलेश घायवळवर हल्ला केला. त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे, हा हल्ला दुसऱ्या कुणाकडून नव्हे तर थेट एका पहिलवानाकडून करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संबंधित पहिलवान हा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड गावचा असल्याचे समजते आहे. हल्ला झाल्यानंतर निलेश घायवळचे समर्थक कार्यकर्ते धावून आले व त्यांनी हल्ला करणाऱ्यावर प्रतिहल्ला चढवला. यानंतर त्या पहिलवानाने तिथून पळ काढला.
हे ही वाचा>> 'यासाठी' 5 मुलांना सोडून गीता पळाली 4 मुलांचा बाप असलेल्या गोपाळसोबत, नंतर फेसबुकवर...
दरम्यान, निलेश घायवळला या हल्ल्यात कितपत इजा झाली आहे, किंवा हल्ला कोणत्या शस्त्राने झाला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या घटनेनंतर घटनास्थळावरून निलेश घायवळनेही निघून जाणे पसंत केले.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर अनेक गुन्हे
पुण्यातील कुख्यात गुंड अशी निलेश घायवळ याची ओळख आहे. ज्याने आपल्या हिंसक कारवायांनी आणि टोळीयुद्धाने शहरात दहशत निर्माण केली. पोलिसांच्या सततच्या कारवायांनंतरही तो जामिनावर सुटका मिळवून पुन्हा सक्रिय होत आहे. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे आणि राजकीय विवादांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.
पुण्यातील अनेक कुख्यात गुंडांवर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी जीवघेणे हल्ले केले असल्याची बरीच उदाहरणं आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. अशावेळी आता निलेश घायवळवर झालेला हा हल्ला त्याच्यासाठी धोक्याचा इशारा असू शकतो.