Lok Sabha Election 2024: माढ्यात खरी लढाई पवार विरुद्ध फडणवीस?

मुंबई तक

ADVERTISEMENT

माढ्यात खरी लढाई पवार विरुद्ध फडणवीस?
माढ्यात खरी लढाई पवार विरुद्ध फडणवीस?
social share
google news

Madha Sharad Pawar vs Devendra Fadnavis: लखन आदाटे, माढा: माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटलांनी दंड थोपटलेत, तर महायुतीकडून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा मैदानात आलेत. खुद्द शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी माढ्याचा गड काबीज करण्यासाठी ताकद लावलीय. एकाच दिवशी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या दोन-दोन, तीन-तीन सभा सुरू आहेत. (lok sabha election 2024 election election between ranjitsinh naik nimbalkar and dhairyasheel mohite patil but real battle in madha is pawar vs fadnavis) 

ADVERTISEMENT

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील अकलूजच्या शिवरत्नवर बंगल्यावर स्नेहभोजनासाठी एकत्र आले होते, त्यावेळचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. याच फोटोतील तिनही नेत्यांनी माढ्यासह सोलापुरातील समीकरणंही बदलली आहेत. त्यातच विजयसिंह मोहिते पाटलांनी जिल्ह्यातील नेत्यांची भेट घेत मोट बांधायला सुरुवात केलीय. विजयसिंह मोहिते पाटलांच्या भेटीगाठीचे फोटो सोशल मीडियावरुन प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

यावरुनच जुन्या सहकाऱ्यांनी एकत्र येत भाजपविरोधातील लढाईचा अजेंडा सेट केलाय ते चित्र स्पष्ट दिसतंय. भाजपनेही शेवटचं हत्यार म्हणून मोदींच्या सभांचा धडाका लावलाय. याधीच्या निवडणुकांमध्ये सोलापूर आणि माढा लोकसभेसाठी  सोलापूर शहरात एकच सभा होत असे.  पण यंदा सोलापूर शहरासह माढा मतदारसंघातील मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असणाऱ्या माळशिरसमध्येही मोदींची सभा झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अगदी 15 दिवसाआधी शरद पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता. तर भाजप एकहाती विजय मिळवेल अशी चर्चा होती. मग असं काय झालं की भाजपसाठी सोपी वाटणारी निवडणूक अवघड झालीय?

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कशामुळे सामना रंगलाय?

2009 ला निर्मिती झाल्यापासूनच माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिलाय. पहिली लढत झाली ती राष्ट्रवादीचे शरद पवार आणि भाजपच्या सुभाष देशमुखांमध्ये. यावेळी मराठी माणूस पंतप्रधान होईल, शरद पवारांना मत द्या, अशी राष्ट्रवादीनं साद घातली आणि मतदारांनी शरद पवारांना माढ्याचे पहिले खासदार होण्याचा मान दिला. 

ADVERTISEMENT

2014 मध्ये विजयसिंह मोहिते पाटलांनी सदाभाऊ खोतांना पराभूत करत राष्ट्रवादीकडून दिल्ली गाठली होती. मोदी लाटेतही मोहिते पाटलांनी विजय खेचून आणलेला विजय लक्षेवधी ठरला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> निकालाआधीच काँग्रेसने गमावल्या दोन जागा, महाराष्ट्रात थोडक्यात वाचली!

2019 ला शरद पवारांनी पुन्हा एकदा माढ्यातून लढण्यासाठी चाचपणी केली होती. मात्र माढा, बारामतीकरांना पाडा. माढा, शरद पवारांना पाडा, अशी मोहीम सोशल मीडियातून राबवण्यात आली होती.

यामागे विरोधकांसोबत स्वपक्षीयसुध्दा असल्याची चर्चा तेव्हा दबक्या आवाजात सुरू होती. राजकीय चाणक्य असणाऱ्या शरद पवारांनी वाऱ्याची  दिशा ओळखली आणि माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार बदलला.

2019 ला या मतदारसंघातील समीकरणं बदलली आणि मोहिते पाटील भाजपसोबत आले. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रणजितसिंह नाईक निबांळकरांनी 2019 ला मोहिते पाटलांच्या मदतीनं विजय मिळवला होता.

आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघातील समीकरण ही अशी बदलत राहिलीत. मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासूनची 2024 ची ही चौथी निवडणूक.  गेल्या 5 वर्षात माढ्यातील समीकरण 360 अंशात बदलली.

5 वर्षाच्या आतच मोहिते पाटलांनी भाजपविरोधात जाण्याची भूमिका घेतली.देशभरात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग असताना मोहिते पाटलांनी भाजपला विरोध करण्याची हिंमत दाखवली.जयसिंह मोहिते पाटलांनी पुढाकार घेत पुतण्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीची घोषणाच करुन टाकली.

याच काळात रासपच्या महादेव जानकरांनीही माढ्यातून लढण्याची तयारी सुरु केली होती. शरद पवार आणि महादेव जानकरांची बोलणीही सुरु झाली होती. पण देवेंद्र फडणवीसांनी परभणीतून महादेव जानकरांना उतरवत शरद पवारांचा डाव उधळून टाकला.

दुसरीकडे शरद पवारांनीही धैर्यशील मोहिते पाटलांच्या हाती तुतारी देत माढा लोकसभा मतदारसंघातला हुकमी एक्का पळवला. मोहिते पाटलांचं जाणं फडणवीसांनी फारच मनावर घेतलय.माझा विश्वासघात करणाऱ्यांचा सत्यानाश होतो म्हणत अकलूजच्या सभेतून फडणवीसांनी मोहिते पाटलांवर निशाणा साधला होता. नाराज फडणवीसांनी रणजितसिंह मोहिते पाटलांना भेटणं टाळल्याचीही चर्चा आहे. मागच्या निवडणुकीत विरोधात निवडणूक लढवणारे संजयमामा शिंदे नाईक निंबाळकरांसोबत आहेत.

हे ही वाचा>> Bharat Gogawale : ''घरच्या बाईमुळे शिवसेना फुटली'',

तर ज्यांच्यामुळे विजय सुकर झाला ते मोहिते पाटील निंबाळकरांच्या विरोधात. त्यामुळे एकमेकांचे जुने हिशोब चुकते करण्याच्या प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जातोय. सगळे मोहिते पाटील गद्दार आहेत. त्यांनी मोदींच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणत नाईक निंबाळकरांकडून हल्लाबोल सुरु आहे.

'तर आम्ही गाढवाला देव म्हणालो होतो, हजारो कोटींचा निधी आणला म्हणून गप्पा मारणाऱ्यांनी विकास दाखवावा..' असं खुलं आव्हान धैर्यशील मोहिते पाटलांनी दिलंय.  या प्रचारात मतदारसंघात समावेश असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 4 आणि सातारा जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघाचे आमदारांकडूनही जोरदार प्रचार सुरुय.

सांगोल्यात शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील,करमाळ्यात अजितदादा गटाचे संजयमामा शिंदे, माढ्यात अजितदादा गटाचेच बबनदादा शिंदे,माण खटावमध्ये आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपमध्ये फडणवीसांचे कट्टर समर्थक जयकुमार गोरे माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते हे आमदार आहेत. जे सध्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंविरोधात भाजपचे उमेदवार आहेत.या सगळ्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठिशी ताकद लावलीय.

फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांचे समर्थक दीपक चव्हाण आमदार आहेत. रामराजे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आधीपासून असलेल्या विरोधामुळे दीपक चव्हाण कितपत काम करतील यात शंका आहे. पण हे झाल लोकप्रतिनिधींचं... सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण गटातटावरच चालतं. 

माळशिरसमध्ये मोहिते पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा असं राजकारण. पण मोहिते पाटलांनी बदलत्या राजकारणाची दिशा ओळखत परंपरागत विरोधकांनाही सोबत घेतलं.. 35 वर्षापासून राजकीय वैर असणारे उत्तम जानकर आणि मोहिते पाटलांमध्ये दिलजमाई झाली. यात जयंत पाटील आणि शरद पवारांची भूमिका महत्वाची राहिली. मोहिते पाटलांची कुमक तोडण्यासाठी फडणवीसांनी पूर्ण प्रयत्न केले.उत्तम जानकरांसाठी हेलिकॉप्टर पाठवलं, पण जानकरांनी हेलिकॉप्टरमधून उडी घेत मोहिते पाटलांशी समझौता केला. याच मतदार संघात पाणीवच्या प्रकाश पाटील आणि मोहिते पाटलांचा 50 वर्षांपासूनचा संघर्षही संपल्यातच जमा आहे. 

बाहेरचा उमेदवार असतानाही नाईक निंबाळकरांना माळशिरसमधून जवळपास सव्वालाखांचं मताधिक्य मिळालं होतं. त्या जोरावरच आता घरचा उमेदवार असल्यानं धैर्यशील मोहिते पाटलांच लीड किमान पावणेदोन लाखांचं असेल असा विश्वास उत्तर जानकरांनी व्यक्त केलाय.

एवढं झाल्यानंतरही विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्याशी फडणवीसांनी संपर्क साधलाय. एका मोहिते पाटलांनी साथ सोडली तर दुसरे मोहिते पाटील जोडून बेरजेचं राजकारण करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे.

सांगोल्यात निंबाळकरांसोबत अजितदादा गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील आहेत. मात्र साळुंखे पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटलांच्या गटापेक्षा शेकापची ताकद अधिक आहे.दिवगंत गणपतआबा देशमुखांचे नातू बाबासाहेब देशमुखांनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय कायम ठेवला.तर दुसरीकडे गणपतआबांचे दुसरे नातू अनिकेत देशमुखांनी माढ्यातून लढण्यासाठी उमेदवारी मागत बंडाचा झेंडा फडकावला.

मात्र शरद पवारांनी दोन नातवांमधील शीतयुद्ध संपवत धैर्यशील मोहिते पाटलांच्या पारड्यात सांगोल्यातून शेकापची मतं टाकली. अन्यथा देशमुख परिवारातील लढाई महायुतीच्या पथ्यावर पडली असती.

सर्वाधिक गट असणाऱ्या करमाळ्याचाही विचार करुया.गेल्या लोकसभेला विरोधात होते ते आमदार संजयमामा शिंदे अजितदादा गटासोबत असल्याने प्रश्न मिटलाय.रश्मी बागल यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढलीय. इथे जयवंतराव जगतापही भाजपसोबत आहेत, मात्र विजयदादांनी भेट घेतलेला फोटो व्हायरल झाल्यानं चर्चा रंगल्या आहेत. याच तालुक्यात शिवसेनेचे माजी आमदार आणि धनगर समाजातील मोठं नेतृत्व असणाऱ्या नारायण पाटलांना सोबत घेत शरद पवारांनी स्कोर लेवल केला. तसंही नारायण पाटील यांची मोहिते पाटील समर्थक म्हणूनही राजकीय वर्तुळात चर्चा असायची.

माढ्यात अजितदादा गटाच्या आमदार बबनदादा शिंदेंचा गट निंबाळकरांच्या पाठिशी आहेच. याशिवाय सुरुवातील प्रचार करणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेला मंत्री तानाजी सावंत यांच्या गटानं आता दिलजमाईची भूमिका घेतलीय. दुसरीकडे बबनदादांचे प्रमुख विरोधक शिवसेनेच्या संजय कोकाटेंनी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतलीय. इथं धनाजी साठेंचा गटही महाविकास आघाडीत आहे. याच मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचाही समावेश होतो.

तर इथूनच प्रशांत परिचारकांचा प्रयत्न निंबाळकरांच्या पारड्यात मत टाकण्याचा राहिल.याशिवाय पंढरपुरातीलच कल्याण काळेंच्या पंढरपूरसह सांगोल्यातील प्रभावाचा महायुतीला फायदा होईल.

या भागात अभिजीत पाटलांसह विठ्ठल परिवारातील नेत्यांचाही प्रभाव आहे. सध्या अभिजीत पाटील शरद पवार गटासोबत आहेत. पण याच पाटलांना गळाला लावण्याचे प्रयत्न फडणवीसांकडून सुरु आहेत. 

अभिजीत पाटील भाजपसोबत गेल्यास माढ्यासह सोलापूर लोकसभेवरही परिणाम होऊ शकतो.कारण पंढरपुरातील सर्व गट भाजपसोबत आल्यानं माढ्यात नाईक निंबाळकरांना आणि सोलापुरात राम सातपुतेंना मोठा फायदा होईल.

फलटण म्हणजे नाईक निंबाळकरांचं होमग्राऊंड. पण इथून लीड घेताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांना घरातूनच विरोध होताना दिसतोय.सुरुवातीला रामराजे नाईक निंबाळकरांनी उमेदवारी देण्यासही विरोध दर्शवला होता.वाद शमवण्यासाठी फडणवीस आणि अजितदादांनाबैठका घेऊन यश आलेलं दिसत नाही. तर रघुनाथराजे नाईक निंबाळकर मोहिते पाटलांसोबत प्रचार करताना दिसून येत आहेत.
शेजारी माण खटावमध्ये जयकुमार गोरेंमुळे निंबाळकरांचं पारडं जड आहे. तर अभयसिंह जगताप आणि प्रभाकर देशमुखांकडून माण तालुक्यात मोहिते पाटलांसाठी प्रचार सुरु.

मात्र आठवड्याभरापूर्वी शेखर गोरेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानं इथली समीकरणं आणखी बदलू शकतात.  माढ्यात मराठा समाजाबरोबर धनगर समाजाचं प्राबल्य आहे. इथली जातीय समीकरणं लक्षात घेता अहिल्यादेवीं होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर यांना सोबत घेत शरद पवारांनी प्रचार सभांचा धडाकाही लावलाय. पंतप्रधान मोदींनी तर धनगरी वेशभुषेत येळकोट येळकोट जय मल्हार चा व्यासपीठावरुनच जयघोष केला

तसं पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून निंबाळकर आणि मोहिते पाटलांमध्ये विकासकामांच्या श्रेयावरुन शीतयुद्ध सुरु होतं.विजयसिंह मोहिते पाटलांच्या कामाचं श्रेय निंबाळकर घेत असल्याचा आरोप मोहिते पाटील गटाकडून केला जात होता. त्यातच मोहिते पाटलांच्या विरोधकांशी निंबाळकरांनी हातमिळवणी केली.अखेर मतभेद एवढे वाढले मोहिते पाटलांनी जाहीरपणे निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला.

रणजितसिंह मोहिते पाटील आणि फडणवीसांमधील ट्यूनिंगमुळे मोहिते पाटील भाजप सोडतील अशी शक्यता वाटली नाही, मात्र भाजपने डावलल्यानं मोहिते पाटील अस्वस्थ होते. अखेर अस्तित्वाची लढाई मानत मोहिते पाटलांनी पुन्हा एकद शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि माढ्याची लढाई अधिक प्रतिष्ठेची झाली. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीकडून खेचून घेतलेला माढ्यासह सोलापूरचा गड राखायचाच असा निर्धार भाजपनं केलाय. तर सोलापूर जिल्ह्याच्या फुल पँटची हाफ चड्डी केलीय. विकासाला कात्री लावली.

सोलापूरला पुन्हा सोन्याचे दिवस आणू म्हणत मोहिते पाटलांनी भाजपला अस्मान दाखवण्याचा चंग बांधलाय. याचाच एक भाग म्हणून निंबाळकरांसोबतच सोलापुरातून बीडचं पार्सल परत पाठवा म्हणत राम सातपुतेंविरोधातही मोहिते पाटील समर्थकांनी ताकद लावलीय. दुसरीकडे माढ्यात अजितदादा गटाच्या रामराजे नाईक निंबाळकरांनी मदत केली नाही तर बारामतीत आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा सोडा.. असा धमकीवजा इशाराच नाईक निंबाळकर यांनी राहुल कुल यांना सोबत घेत दिलाय.

माढ्यातील बदलेल्या राजकीय समीकरणाचे पडसाद हे असे सोलापूरसह पुणे आणि सातारा जिल्ह्यात उमटलेत. आता हे चित्र पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की माढ्याची लढाई दिसते तेवढी सोपी नाही. म्हणूनच काटावरील आणि अस्थिर असणाऱ्या नेत्यांना आणि छोट्या छोट्या गटांनाही आपल्याकडे वळवण्यासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये स्पर्धा रंगलीय. 

काहींना विधानसभेचे आश्वासनही देण्यात आलेय.त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेच्या रणांगणात पवार-फडणवीसांमधील युद्द पुन्हा एकदा दिसून येईल.आता या सत्तासंघर्षात कोण बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT