पुण्यात पुन्हा तसाच प्रकार! सिम्बायोसिसच्या डॉक्टरने मागितले 20 हजार, म्हणाले ऑपरेशन करायचं असेल तर...
डॉक्टरने शस्त्रक्रिया करण्यासाठी 20 हजार रुपये रोख देण्याची मागणी केली. तसंच पैसे न भरल्यास रुग्णाच्या जीवाला धोका होईल, अशी धमकी दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुन्हा आणखी एका रुग्णालयाने तेच केलं

डॉक्टरने रुग्णाला सर्जरीआधी मागितले 20 हजार

आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल
Pune News : पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप निर्माण झाला होता. मात्र, अशा घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. पुण्यातील लाव्हाळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठाच्या धर्मादाय रुग्णालयाने पुन्हा तसाच प्रकार केला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांकडून 20,000 रुपयांची मागणी केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. धर्मादाय रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार करणं अपेक्षित आहे. मात्र, इथे डॉक्टरने थेट पैशांसाठी रुग्णालाच इशारा दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा >> शाळेतल्या 13 वर्षाच्या मुलींना जवळ बोलावलं, सोलापुरात 68 वर्षाच्या वृद्धाने लाज सोडून... पोक्सो अंतर्गत गुन्हा
नेमकी घटना काय?
ही घटना 4 ते 9 एप्रिल दरम्यान सिम्बायोसिस रुग्णालयात घडली. आरोपी डॉक्टरचं नाव डॉ. प्रवीण वामनराव लोहोटे (वय 55, रा. चंदन नगर, पुणे) अशी आहे. तक्रारदार दिलीप लक्कप्पा शिवशरण (वय ३८, रा. उत्तम नगर, पुणे) यांनी बुधवारी, 9 एप्रिल रोजी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशरण यांच्या आत्या यांना किडनी स्टोनशी संबंधित आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालय हे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून, रुग्णांवर मोफत उपचार केले जातात, याची डॉक्टरला पूर्ण कल्पना होती. तरीही, डॉ. लोहोटे यांनी शिवशरण यांना रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं आणि तातडीने शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे नमूद केलं.
डॉक्टरने शस्त्रक्रिया करण्यासाठी 20 हजार रुपये रोख देण्याची मागणी केली. तसंच पैसे न भरल्यास रुग्णाच्या जीवाला धोका होईल, अशी धमकी दिली.
हे ही वाचा >> ST कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्केच पगार, MSRTC मध्ये नेमकं काय घडतंय, नेमकं प्रकरण काय?
डॉक्टरांच्या या मागणीमुळे घाबरलेल्या शिवशरण यांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणली. यापूर्वीही डॉ. लोहोटे यांना अशा प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. रुग्णालय प्रशासनानं तातडीने अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली. चौकशीअंती रुग्णालय प्रशासनाने शिवशरण यांच्यासह बावधन पोलिस ठाण्यात जाऊन औपचारिक तक्रार दाखल केली.
बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी याबद्दलची माहिती दिली. धर्मादाय रुग्णालयाच्या नियमांचा भंग आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे धर्मादाय रुग्णालयांमधील अनियमिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.