Rohit Pawar ED : शरद पवारांसोबत असलेले आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. रोहित पवार या चौकशीला जाणार आहेत. दरम्यान, रोहित पवारांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे, याबद्दल खुलासा केला. (Rohit Pawar First Reaction on ED Summons)
ADVERTISEMENT
विधान भवनात रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीकडून चौकशी केल्या जात असलेल्या प्रकरणाची माहिती दिली.
ईडीच्या कारवाईबद्दल रोहित पवारांनी काय सांगितलं?
ईडी चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले, “ईडीच्या विरोधात कुठेही आव्हान देण्याचा प्रयत्न करत नाही. ईडीने जी कागदपत्रे मागितली, ती दिली आहेत. यापुढेही देऊ. उद्या सकाळी १०.३० वाजता मी जाणार आहे. शरद पवारांनी सांगितले की, मी सुद्धा तिथे राष्ट्रवादी भवनमध्ये असणार आहे. शेवटी एखाद्या कार्यकर्त्याला मुद्दामहून अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असेल आणि शरद पवारांसारखी व्यक्ती ज्याला बाप माणूस म्हणतो. ती सोबत असेल तर हुरुप येतो. सुप्रिया सुळेही आहेत. आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की गर्दी करू नका. आजपर्यंत जे सहकार्य ईडीला केलं आहे, तसंच सहकार्य उद्याही करेन. जे कुठले प्रश्न असतील, त्यांना योग्य उत्तरं देईन.”
माझी केस थोडी वेगळी आहे -रोहित पवार
राजकीय दबाव टाकण्यासाठी ईडीची कारवाई होतेय का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, “तुम्ही हाच प्रश्न महाराष्ट्रातील सामान्य लोकांना विचारला, तर त्यांचं हेच मत येतं की, मईडीची कारवाई सुरू झाली. त्याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या. माझी केस जी आहे, ती थोडी वेगळी आहे. माझी जी चौकशी सुरू आहे, ती महाराष्ट्र सहकारी बँकेशी संबंधित आहे. यात माझाच कारखाना आहे, असं नाही. यामध्ये ६०-७० लोकांचे कारखाने आणि कंपन्या आहेत.”
हेही वाचा >> “बालीचा राजकीय वध करावा लागेल, कारण…”, ठाकरेंनी शिंदेंविरोधात थोपटले दंड
याच प्रकरणाबद्दल रोहित पवार पुढे म्हणाले की, “इतर जे कारखाने आहेत, त्यांची केस वेगळी आहे. माझ्या कारखान्याची केस सेफ आहे. पण, राजकारण न करता मी एवढंच सांगेन की, ईडीच्या माध्यमातून सहकारी बँकेच्या प्रकरणात जी काही कारवाई आज केली गेली आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांची नावे घेतली आहेत, ती सर्व पक्षांची आहेत.”
रोहित पवारांनी दिला अजित पवारांचा दाखला
रोहित पवारांनी अजित पवारांनी केलेल्या विधानाबद्दलची बातमी दाखवली. ते म्हणाले, “तुम्ही जर २०२१ मध्ये अजित पवारांनी माध्यमांना जे उत्तर दिले. त्यामध्ये अजित पवार स्वतः म्हणताहेत की, ६४ इतर कारखाने आहेत. यादीमध्ये अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे कारखानेही आहेत. काही लोक काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होते, आज ते भाजपमध्ये आहेत. त्यांना सुद्धा आश्वासित करतो की, या केसमध्ये माझंही नाव आहे. मी चूक केलेली नाही. मी तर लढणारच आहे. यातून मी बाहेर निघेन. पण, मी एकटा बाहेर नाही निघणार. राजकीय द्वेषातून ही कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातून मी तुम्हा सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन.”
हेही वाचा >> कपाळी टिळा, रत्नजडित दागिने… रामलल्लाच्या अलौकिक श्रृंगाराचे वैशिष्ट्य काय?
“हे जे सर्व अधिकारी आहेत. ते त्यांचं काम करतात. कदाचित त्यांच्यावर काही लोकांचा दबाव असून शकतात. त्यांच्याविरुद्ध मी बोलत नाही. राजकीय द्वेषातून ही कारवाई झाली असेल, तर या सर्व लोकांच्या वतीने मी लढणार. लोकशाही आणि कुणाचाही आवाज दाबण्यासाठी जर यंत्रणांचा वापर केला जात असेल, तर मराठी माणसं शांत बसत नाही. मराठी माणसं पळून जात नाही. ते लढतात. मी सुद्धा मराठी माणूस म्हणून जोपर्यंत जिंकत नाही, तोपर्यंत लढत राहणार”, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली.
ADVERTISEMENT