Lasya Nandita Death: हैदराबाद: तेलंगणातील विरोधी पक्षात असलेल्या भारत राष्ट्र समिती (BRS) च्या तरुण नेत्या आणि आमदार लस्या नंदिता यांचे आज (23 फेब्रुवारी) निधन झाले. पाटनचेरू येथे झालेल्या एका भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 37 वर्षीय लस्या या सिकंदराबाद कॅन्टच्या आमदार होत्या. (telangana brs mla lasya nanditha dies in road accident uncontrolled car hits divider)
ADVERTISEMENT
या घटनेबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, आमदार नंदिता ज्या कारमधून प्रवास करत होत्या त्या कारचा आज पहाटे 5.30 वाजेचा दरम्यान भीषण अपघात झाला. आऊटर रिंग रोड (ORR)येथून जात असताना त्यांच्या कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक एवढी जबर होती की, नंदिता यांचा मृत्यू झाला. या अपघातात कार चालक जखमी झाला आहे. नंदिता यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी आमदार नंदिता यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनीही नंदिता यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
हे ही वाचा>> Bhiwandi : रिल बनविताना तरूणाची थेट खाडीत उडी
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ट्विट केले की, 'कॅन्टच्या आमदार लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाने मला खूप धक्का बसला आहे. नंदिताचे वडील दिवंगत सायन्ना यांच्याशी माझे जवळचे संबंध होते. गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांचे निधन झाले. नंदिता यांच्या निधनाचे खूप वाईट वाटते. याच महिन्यात त्यांचाही अचानक मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.'
आमदार नंदिता दोनदा मृत्यूच्या दाढेतून आलेल्या परत...
आमदार नंदिता यांनी एकदा नव्हे तर दोनदा मृत्यूला हुलकावणी दिली होती. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्या एका लिफ्टमध्ये असताना अचानक ओव्हरलोडिंगमुळे लिफ्ट थेट सहा फूट खाली गेली होती. त्यावेळी सुदैवाने त्यांना काही दुखापत झाली नव्हती.
तर काही दिवसांपूर्वीच म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी त्या नलगोंडा येथे जात असताना एका अपघातातून थोडक्यात बचावल्या होत्या. मात्र, या अपघातात एका होमगार्डचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा>> McDonald कडून ग्राहकांची घोर फसवणूक
त्यामुळे त्यांनी दोनदा काळाला चकवा दिला होता. मात्र, दुर्दैवाने आज त्यांचा अपघातात मृत्यू झाला.
कोण आहे लास्या नंदिता?
लस्या नंदिता या तेलंगणाच्या प्रमुख नेत्या होत्या. पाच टर्म आमदार राहिलेल्या सायन्ना यांच्या त्या कन्या होत्या. सायन्ना यांचे देखील मागील वर्षी याच महिन्यात निधन झाले होते. 37 वर्षीय लस्या या गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून पहिल्यांदाच सिकंदराबाद कँट मतदारसंघातून आमदार बनल्या होत्या. त्यांचे वडीलही याच मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले होते.
लास्या नंदिता यांच्या निधनाने बीआरएस पक्षाला मात्र, मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT