trupti desai vs nivrutti maharaj indurikar : तिने 3 गाणी वाजवली आणि 3 लाख रुपये घेतले, असं म्हणत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गौतमी पाटीलवर टीका केली. इंदुरीकर महाराजांचं हे विधान सोशल मीडियावर चांगलं व्हायरल झालं. त्यांच्या या विधानावर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उत्तर दिलंय. तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांना गौतमी पाटील टीका करण्यावरून खडेबोल सुनावले आहेत. राजकारणी आणि काळ्या पैशाचा उल्लेख करत तृप्ती देसाई निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर भडकल्या.
ADVERTISEMENT
“तिने (गौतमी पाटीलने) 3 गाणी वाजवली आणि 3 लाख रुपये घेतले; तिच्या कार्यक्रमात मारामारी झाली. काहींचे गुडघेही फुटले, पण तिच्याविषयी काही बोललं जात नाही आणि आम्ही ५ हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात की काय खरंय त्याचं”, असं निवृत्ती महाराज इंदुरीकर बीड जिल्ह्यात एका कीर्तनात म्हणाले. त्यांचं हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि व्हिडीओही चर्चेत आला. या विधानावरून तृप्ती देसाईंनी इंदुरीकर महाराजांना सुनावलं.
तुम्ही किती पैसे घेता, हे सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे -तृप्ती देसाई
तृप्ती देसाई म्हणाल्या, “अहो इंदुरीकर, ज्या महिलांचा तुम्ही अपमान करता, ज्यांची बदनामी करता, शिवराळ भाषा वापरता. तुमच्यावर अशी नामुष्की आली की, अनेक महिलांविषयी जे चुकीचे बोलला ते व्हिडीओ तुम्हाला डिलीट करावे लागले. आता एखादी महिला लावणीसम्राज्ञी म्हणून पुढे आली आणि तिच्या लाखो रुपयांवर तुम्ही बोलताहेत. म्हणजे तुम्ही पैसे कमावता.तुम्ही काही कुणाकडून पाच हजार घेत नाही. तुम्ही किती पैसे घेता, हे सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे.”
हेही वाचा – इंदुरीकर महाराज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; “त्यांचं वाटोळ होणार, मुलं…” पाहा व्हिडीओ
तृप्ती देसाईंनी पुढे म्हटलं आहे की, “तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो आणि राजकारणी तुमच्यावर पांघरून का घालतात, हेही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे एखादी महिला पुढे चालली की त्याविषयी बोलायचे आणि स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे पैसा तुम्हीच कमवायचा का? तुम्ही ज्या महिलेविषयी, गौतमी पाटील लावणी करतात. तुम्ही कीर्तन करता. कीर्तनातून प्रबोधन करताना लोक जे मानधन देतील, ते स्वीकारायचे असते, पण तुमचे आकडे इतके उच्च आहेत की, तुम्ही पाच हजार वगैरे कमवून… कुणी बदनाम करत असतं, तर आम्हीही विरोध केला असता. तुम्ही सगळे पैशांचा बाजारच करता”, असं म्हणत तृप्ती देसाईंनी निवृत्ती इंदुरीकर महाराजांवर टीका केली आहे.
म्हणजे पुन्हा एकदा महिला पुढे गेलेली चुकीची वाटलेली आहे, तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
“अनेक कीर्तनकार इतके चांगले आहेत की, जे जनता किंवा लोक देतील त्या मानधनावर कीर्तन करतात. परंतु इंदुरीकर आणि इतर काही लोक आहेत, जे आकडे सांगतात, मोठंमोठे आकडे सांगतात आणि त्यानुसार पैसे स्वीकारतात म्हणून तुम्हाला पैशांचा बाजार केला असं म्हटलं जाते आणि म्हणणारच. गौतमी पाटीलला बोलवत असतील आणि स्वतःहून मानधन देत असतील. तुमच्या पोटात दुखायचं कारण काय?”, असा सवाल तृप्ती देसाईंनी केला.
हेही वाचा – इंदुरीकर महाराजांवर चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, महिलांना छळायची शिकवण देताय का?
“तुम्ही जे पैसे कमावता त्याबद्दल लोक बोलतात. तिला प्रेम मिळतं. तिच्याविषयी कुणी चांगले बोलेल वाईट बोलेल, परंतु तुम्ही बोललात म्हणजे पुन्हा एकदा महिला पुढे गेलेली चुकीची वाटलेली आहे. तुम्हीच पैसा कमावला पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे”, अशा शब्दात तृप्ती देसाईंनी इंदुरीकर महाराजांचा त्या विधानावरून समाचार घेतला.
ADVERTISEMENT