Avinash Manatkar akola: अकोला जिल्ह्यातील भाजपच्या नेत्या नयना मनतकार (nayana manatkar) यांचे पती अविनाश मनतकार यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलीये. नागपूरमधील अजनी भागात अविनाश मनतकार यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आयुष्य संपवलं. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्य अविनाश मनतकार यांनी भाजपच्याच माजी आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. (avinash manatkar committed suicide)
ADVERTISEMENT
नागपूरमधील अजनी परिसरात अविनाश मनतकार यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. अविनाश मनतकार हे नयना मनतकार यांचे पती आहे. नयना मनतकार या भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या आणि अकोला जिल्हा परिषदेच्या माजी सभापती राहिलेल्या आहेत.
अविनाश मनतकार मूळचे तेल्हारा तालुक्यातील मनात्री गावचे रहिवासी होते. तेल्हारा येथील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे ते संचालक होते. तेल्हारा येथे त्यांचा पेट्रोलपंपही आहे. काही दिवसांपूर्वी मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणात मनतकार दाम्पत्यावर गंभीर आरोप झाले. त्यानंतर त्यांनी जीवनच संपवलं.
शेगावला जायचे म्हणून गेले अन् परत आलेच नाही
अविनाश मनतकार आणि नयना मनतकार हे दोघंही गुरुवारी (17 फेब्रुवारी) न्यायालयीन कामनिमित्त नागपूरला गेले होते. दरम्यान, शेगावला जायचं आहे, असं नयना मनतकार यांना सांगून ते बाहेर पडले. रात्रीपर्यंत अविनाश मनतकार परत आलेच नाही. त्यांच्याकडे मोबाईल नसल्यानं नयना मनतकार यांनी नातेवाईकांना ते बेपत्ता झाल्याची माहिती दिली. अविनाश मनतकार यांचा शोध घेतला जात असतानाच त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.
अविनाश मनतकार यांची सुसाईड नोट… सहा वेळा आमदार राहिलेल्या चैनसुख संचेती यांच्यावर गंभीर आरोप
आत्महत्येपूर्वी मनतकार यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती. यात भाजपचे बुलडाणा जिल्ह्यातील माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचं म्हटलंय त्यांनी म्हटलेलं आहे.
चैनसुख संचेती हे बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा मतदारसंघातून तब्बल सहा टर्म भाजपाचे आमदार होते. चैनसुख संचेती अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारात अध्यक्ष संचेती आणि उपाध्यक्ष लखाणी यांनी पती-पत्नींना फसवल्याचा आरोप अविनाश मनतकार यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे.
यासोबतच या प्रकरणाचा तपास करणारे अकोल्यातील रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी आपल्याकडून 38 लाख उकळूनही आपल्याला मदत केली नाही, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये मनतकार यांनी केला आहे. संपुर्ण संचालक मंडळाची चौकशी करण्याचं त्यांनी मृत्यूपुर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं आहे. ही सुसाईड नोट त्यांनी अकोल्याच्या पोलीस अधिक्षकांना लिहिलेली आहे.
ADVERTISEMENT