गजा मारणे आणि दहशत, यापेक्षा आता गजा मारणे वाद असं समीकरण झालंय. पण यावेळी गजा मारणेच्या सुटकेला राजकीय अँगलही असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच आता पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याची चर्चा जोर पकडू लगालीय. गजा मारणेच्या जामिनावर झालेल्या या सुटकेनंतर आता काय वाद होतेय? ज्या प्रकरणात गजा मारणेला जामीन मिळाला ते प्रकरण काय? त्याचबरोबर पुन्हा एकदा पुण्यात गँगवॉर पेटणार का आणि गजा मारणेला सोडवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप आहे का? हेच समजून घेऊयात…
ADVERTISEMENT
गजानन मारणे उर्फ गजा मारणेची 3 एप्रिलला जामिनावर सुटका झाली. पण या सुटकेमागे राजकीय हात असल्याचं बोललं जातंय. गजा मारणे याच्याविरोधात पुणे शहरासह जिल्ह्यात सुमारे 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. मोक्का अंतर्गत गजावर कारवाई झाली आहे. असं असलं तरी इतर गुन्ह्यांप्रमाणे याही गुन्ह्यात गजा मारणेची पुरेशा पुराव्याअभावी सुटका झाली आहे. यावरुनच कॉण्ट्रोव्हर्सीला सुरुवात झालीय.
गजा मारणेला जामीन… चर्चा होण्याचं कारण काय?
गजा मारणे फेब्रुवारी २०२१ ला येरवडा तुरुंगातून सुटला त्यावेळी त्याची जंगी मिरवणूक निघाली होती. त्यावेळी ३०० गाड्यांचा ताफा एक्स्प्रेस हायवेवर होता. ज्यामुळे एक्स्प्रेस हायवे जाम झाला होता. यावरुनही गजाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गजाची ज्या प्रकरणातून सुटका झाली, हे प्रकरण साधारण त्यानंतरचंच आहे.
पुण्यातील एक व्यावसायिक आणि शेअर दलालाचं अपहरण गजा मारणेच्या टोळीने केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मारणे टोळीने मागितली होती. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी मारणे टोळीने केली होती.
हेही वाचा – पुण्यातील तरुणाईला गुंडांचं आकर्षण का वाटतंय?
त्यानंतर व्यावसायिकाने तक्रार दाखल केल्यानंतर, 20 कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचं अपहरण केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने 18 जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. 16 ऑक्टोबर 2022 ला साताऱ्यातील वाईमधून गजा मारणेला पोलिसांनी उचललं. याच गुन्ह्याच्या तपासासाठी गजा आणि त्याच्याबरोबर 14 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती.
169 मुळे काय झालं, पोलिसांवर राजकीय दबाब?
गजासह दोघा साथीदारांना मोक्का न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपास करता यावा यासाठी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी हा आदेश दिला होता. 3 एप्रिलला याच प्रकरणात गजाची 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर शिवाजीनगर न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती.
महत्त्वाचं म्हणजे गजाची ही सुटका पुरेशा पुराव्याअभावी झाली. पुरेसे पुरावे नसल्याचा युक्तिवाद गजाच्या वकिलांनी कोर्टात केला होता. या प्रकरणात गजावर लागलेला मोक्का ही गजाच्या सुटकेतील मोठी अडचण होती. पोलिसांनी 169 चा रिपोर्ट दिल्याने गजाची या प्रकरणात सुटका झाली.
मोक्का वगळण्यासाठीच पोलिसांनी दिलेला 169 चा रिपोर्ट दिला असे आरोप होताहेत. ज्यावरुन आता वाद सुरू झाला आहे. हा रिपोर्ट सादर करण्यासाठी पुणे पोलिसांवर राजकीय दबावाचे आरोप होताहेत. म्हणूनच गजाची सुटका ही राजकीय दबावातून झाल्याचं बोललं जातंय.
या सुटकेबरोबर आणखीन एक चर्चा सुरू झालीय. ती म्हणजे गजाची सुटका करण्यासाठी एका पक्षातला खासदार काही महिन्यांपासून प्रयत्न करत होता. निवडणुकीत फायदा करुन घेण्यासाठी गजाला सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय. याचा परिणाम म्हणून पुणे पोलिसांनी सादर केलेला 169 चा रिपोर्ट असल्याची शक्यता वर्तवण्यात येते.
गजा मारणेला जामीन, पुण्यात पुन्हा गँगवॉर भडकणार?
आता गजाची सुटका झालीय त्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित गुन्ह्यांचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. इतकंच नाही तर पुण्यात गँगवॉर भडकू शकेल. कारण आहे ते मारणे आणि घायवण गँगची जुनी टशन. पुण्यातील घायवळ गँग आणि मारणे गँग यातील वर्चस्वाचा वाद पुण्यात एकेकाळी प्रचंड गाजला. त्यानंतर अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणे याला अटक झाली. तो ३ वर्ष येरवडा कारागृहात होता. त्यामुळे काहीशी शांतता होती. पण आता गजा सुटल्यामुळे आणि त्याच्यामागे राजकीय वरदहस्त असल्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉर उसळू शकेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT