-कुवरचंद मंडले, नांदेड
ADVERTISEMENT
Honour Killing in Nanded : पुरोगामी महाराष्ट्र हादरवून टाकणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली. मुखेड तालुक्यातील कृष्णावाडीजवळील मनुतांडा येथे एका बापाने पोटच्या लेकीचा कोयत्याने वार करत जीव घेतला. कुणाला शंका येऊ नये म्हणून आईवडिलांनी लागलीच मृतदेह जाळून टाकला. मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव आईवडिलांनी रचला, पण गावातील लोकांना संशय आल्याने प्रकरण पोलिसांत गेले. तपासानंतर जे समोर आले, त्याने अवघ्या गावाला धक्का बसला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.
मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मुकराबाद पोलिसांना एका व्यक्तीने दिली. हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव शामका अण्णाराव राठोड असे आहे. ती अवघी 16 वर्षांची होती. तिची वडील अण्णाराव गोविंद राठोड याने 2 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता रागाच्या भरात कोयत्याने मारून निर्घृण हत्या केली.
मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव
आरोपी अण्णाराव राठोडने नातेवाईकांना सांगितले की मानसिक दबावामुळे शामकाने गळफास घेतला. हे गाव मुकरमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. मात्र, पोलिसांपर्यंत या घटनेची माहिती गेली आणि शेवटी अण्णाराव राठोडच्या हातात बेड्या पडल्या.
प्रकरण नेमकं काय, घटना कशी घडली?
मयत मुलगी शामका राठोड (वय 16) हिचे मुखेड तालुक्यातील राजुरा तांडा येथील नातेवाईकाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब समजल्यानंतर शामकाच्या वडिलांनी याला विरोध केला. पण, शामका नातेवाईकाच्या लग्न करण्यावर ठाम होती.
वाचा >> Sharad Pawar Meet Ajit Pawar: ‘सामना’चा अग्रलेख शरद पवारांच्या जिव्हारी, पत्रकारावर संतापले!
2 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पित्याने घरातच शामकाच्या मानेवर आणि हातावर कोयत्याने सपासप केले. शामका रक्तबंबाळ झाली आणि तिने जागेवरच जीव सोडला. घटनेनंतर आरोपीने मुलीचा मृतदेह शेतात नेला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळूनही टाकला.
शामकाचा मृतदेह जाळल्यानंतर आरोपी घरी आला. घरातील रक्ताचे डाग पाण्याने धुतले. नंतर हत्येसाठी वापरलेला कोयता उसाच्या शेतात फेकून दिला. इतकंच नाही, तर आरोपीने पत्नीला घडलेल्या प्रकाराबद्दल कुणाला सांगितलं, तर हत्या करेन अशी धमकी दिली.
हत्येची घटना कशी आली समोर
शामकाने आत्महत्या केल्याचा बनाव आरोपीने केला. पण, गुपचूप शेतात नेऊन मुलीवर अंत्यसंस्कार केल्याने गावातील लोकांना संशय आला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. शामकाने आत्महत्या केली की हत्या, हे शोधणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. पोलिसांनी अनेकांचे गोपनीय जबाब नोंदवले. 9 ऑगस्ट रोजी मानुतांडा येथील काही जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. मुलीवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणाहून हाडांचे नमुने आणि राख तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत पाठवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले.
वाचा >> सना खान हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! पतीबरोबर आणखी एकाचा सहभाग, कोण आहे तो?
पोलिसांनी पुन्हा मनुतांडा येथील काही लोकांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले. ‘खाकी के सामने गुंगे भी बोलतो’ असं म्हणतात. अखेर पोलीस ठाण्यात मृताच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी पती अण्णाराव राठोड याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये मुकरमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली असून सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके पुढील तपास करत आहेत.
मुकरामाबाद पोलिसांनी अनेक गोपनीय जबाब नोंदवले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी माधव पवार, बब्रुवान लुंगारे, शौकत ताहेर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची उकल करण्यत आली.
ADVERTISEMENT