Mahalakshmi Murder Case : एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण बंगळुरू हादरलं आहे. महालक्ष्मी नावाच्या एका 29 वर्षीय महिलेचा मृतदेह फ्रिजमध्ये सापडला, तोही तुकड्यांमध्ये... हे अतिशय भयानक दृश्य होतं. आता हळूहळू हत्येचं गूढ उलगडतंय. पोलीस आरोपीचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूतून पळ काढण्यापूर्वी आरोपीने आपल्या भावाला महालक्ष्मीची हत्या केल्याचे सांगितले होते. आता आरोपीला पकडण्यासाठी बंगळुरू पोलिसांची पथके पश्चिम बंगाल आणि ओडिशात पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मृतदेहाचे 32 तुकडे नसून त्यापेक्षा कितीतरी जास्त तुकडे असल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
मृतदेहाचे तब्बल 59 तुकडे!
21 सप्टेंबर रोजी 29 वर्षीय महालक्ष्मीचा छिन्नविछिन्न मृतदेह शवविच्छेदनासाठी बंगळुरूतील बोवरिंग नावाच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला होता. शवागारातील खोली आणि फ्रीजमधून सापडलेल्या मृतदेहाचे तुकडे मोजले असता, आरोपीने महालक्ष्मीचे 30-40 नव्हे तर 59 तुकडे केल्याचे उघड झाले. मृतदेहाचे इतके तुकडे पाहून शवागारातील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला.
हेही वाचा : India Today Conclave: 'आम्हीच ओरिजिनल म्हणणाऱ्यांना आम्ही...', CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
महालक्ष्मीच्या खोलीत सापडली ट्रॉली बॅग
महालक्ष्मी बंगळुरूच्या व्यालिक्कवल भागात तीन मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत होती. 21 सप्टेंबर रोजी महालक्ष्मीच्या खोलीत फ्रिज आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे विखुरलेले आढळले. सुमारे 19 दिवसांपूर्वी महालक्ष्मीची हत्या झाल्याचा संशय आहे. महालक्ष्मीच्या खोलीत ठेवलेली ट्रॉली बॅगही पोलिसांना सापडली. बंगळुरू पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे त्याच ट्रॉली बॅगेत ठेवून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन आरोपीने रचला असण्याची शक्यता आहे. मात्र हा परिसर अत्यंत गजबजलेला असल्याने बहुधा त्याला मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याची संधी मिळाली नाही.
खोलीतच हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे
खोलीत केलेल्या तपासानंतर हत्या त्याच खोलीत झाली असून मृतदेहाचे तुकडेही तिथेच करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांचे असेही म्हणणे आहे की, हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर खोली आणि बाथरूम साफ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह महालक्ष्मीच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यानंतर बंगळुरूमध्येच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा : Mumbai Rain: मुंबईत तुफान पाऊस, आज शाळांना सुट्टी; Red Alert मुळे BMC चा निर्णय
पोलिसांना आरोपीबाबत मिळाला महत्त्वाचा पूरावा
आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की महालक्ष्मीची हत्या करणारा नेमका कोण आहे आणि हत्येचे कारण काय आहे? मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीचे कुटुंब मुंबईत राहत असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. बंगळुरू पोलीस याच आरोपीच्या भावापर्यंत पोहोचले. आरोपीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर त्याच्या भावानेच आपल्याला महालक्ष्मीची हत्या केल्याचे फोनवर सांगितले होते.
त्याचबरोबर आरोपीच्या भावाने दिलेल्या माहितीनंतर, बंगळुरू पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून आरोपीबद्दल महत्त्वाचे पुरावे आणि क्लूस मिळाले आहेत. महालक्ष्मी राहत असलेल्या व्यालिकवाल परिसरात, तिच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यामध्ये आरोपीचे फुटेज कैद झाले आहे. बंगळुरूच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे आणि त्याला पकडण्यासाठी पोलीस पथके अनेक राज्यात पाठवण्यात आली आहेत.
आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा
बंगळुरू पोलीस ज्या आरोपीचा शोध घेत आहेत तो देखील हेअर ड्रेसर आहे. महालक्ष्मीशीही त्याचे जवळचे नाते होते. हा हेअर ड्रेसर मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. महालक्ष्मीच्या हत्येनंतर तो सध्या भुवनेश्वरमार्गे पश्चिम बंगालमध्ये कुठेतरी लपला असल्याची माहिती आहे. आरोपीचे नाव देखील कळाले आहे, परंतु ते उघड करण्यात आलेले नाहीये.
महालक्ष्मीच्या पतीचा यापूर्वी अशरफ नावाच्या व्यक्तीवर संशय
महालक्ष्मीच्या हत्येनंतर तिचा पती हेमंत दास याने सुरुवातीला या हत्येत अशरफ नावाच्या व्यक्तीवर शंका व्यक्त केली होती. अशरफ देखील हेअर ड्रेसर असून मूळचा उत्तराखंडचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशरफचीही महालक्ष्मीसोबत मैत्री होती. हेमंत दास (महालक्ष्मीचा एक्स पती) याने याआधी अशरफवर आरोपही केला होता की, त्याचे महालक्ष्मीसोबत अफेअर होते आणि याच अफेअरमुळे हेमंत आणि महालक्ष्मी 9 महिन्यांपूर्वी वेगळे झाले होते.
अशरफचा हत्येशी कोणताही संबंध नाही
हेमंतच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अशरफचा शोध घेतला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. त्याची सखोल चौकशी केली. त्याचे जबाब, गेल्या 20 दिवसांतील त्याचे ठिकाण, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीनंतर पोलिसांनी अशरफची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशरफचा महालक्ष्मीच्या हत्येशी कोणताही संबंध नाहीये. खरा आरोपी सध्या बंगालमध्ये आहे.
हेही वाचा : Mumbai Rain: मुंबईत भयंकर पाऊस, मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प!
19 ऑगस्ट रोजी महालक्ष्मी आपल्या कुटुंबाला शेवटची भेटली
महालक्ष्मीचे कुटुंब मूळचे नेपाळचे आहे, पण ते गेल्या ३५ वर्षांपासून ते बंगळुरूमध्ये राहत आहेत. एकाच शहरात राहूनही महालक्ष्मीची तिच्या आई, बहीण किंवा भावाशी तितकीशी जवळीक नव्हती. 9 महिन्यांपूर्वी पती हेमंत दासपासून विभक्त झाल्यानंतर महालक्ष्मी आई किंवा बहिणीसोबत राहण्याऐवजी भाड्याच्या घरात एकटीच राहत होती. तिला एक लहान मुलगाही आहे जो तिच्या पतीकडे असतो. रक्षाबंधनच्या मुहूर्तावर महालक्ष्मी तिच्या कुटुंबाला शेवटची 19 ऑगस्टला भेटली होती.
ADVERTISEMENT