Pune Porsche Accident News : ओंकार वाबळे : पुण्याच्या पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात या घटनेत अल्पवयीन आरोपीचा गुन्हा चालकाच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा होती. या संदर्भातला मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपी सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) (आरोपीचे आजोबा) याने कार चालकाचा मोबाईल काढून घेतला, राहत्या घरी कोंडून ठेवलं आणि ड्रायव्हरवर दोष घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. (pune porsche accident news surendra agarwal sent police custody may 28 visha agarwal pune accident)
ADVERTISEMENT
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी या घटनेबाबतची नवीन माहिती उघड केली. ज्या दिवशी हा अपघात झाला, त्यादिवशी रात्री ड्रायव्हरवर गुन्ह्याची जबाबदारी स्वत:वर घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळेच ड्रायव्हरने त्याच्या पहिल्या जबाबात आपण गाडी चालवत असल्याचे सांगितले होते, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.
हे ही वाचा : "कीर्तिकरांचा निर्णय तीन दिवसांत होणार", शिंदेंच्या नेता काय बोलला?
अमितेश कुमार पुढे म्हणाले, रात्री ड्रायव्हर पोलिस स्टेशनमधून निघाल्यानंतर आरोपी सुरेंद्र अग्रवाल याने त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला त्याच्या राहत्या घरी कोंडून ठेवले आणि ड्रायव्हरवर दोष घेण्यासाठी दबाव टाकला होता. त्यानंतर चालकाच्या कुटुंबियानी त्याचा शोध घेतला असता अग्रवाल यांच्या निवासस्थानी त्याची सुटका झाली होती. तेव्हापासून चालक घाबरला होता. क्राईम ब्रँचने चालकाचा जबाब घेतला असून, सोमवारी याप्रकरणी विशाल अग्रवालला पुन्हा अटक करण्यात येणार आहे.
ड्रायव्हरने त्याच्या दुसऱ्या जबाबात सांगितले की, तो गाडी चालवत नव्हता. त्यामुळे दबावाखाली आपण गाडी चालवत असल्याचे पहिल्या जबाबात म्हटल्याचे त्याने सांगितले.
28 मेपर्यंत पोलिस कोठडी
दरम्यान आज सुरेंद्र अग्रवाल यांना न्यायलयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी कोर्टात सांगितले की, सुरेंद्र अग्रवालने कार चालकाचे अपहरण करून त्याला बंगल्यावर नेले आणि तेथे त्यांनी कार अपघाताचा दोष स्वतःवर घेण्यासाठी दबाव टाकला. या संबंधित आम्ही काही सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहेत, अशी माहिती दिली. आणि सुरेंद्र अग्रवालला सात दिवसांच्या कोठडीत पाठवण्याची मागणी पोलिसांनी केली होती.
हे ही वाचा : भाजप, काँग्रेसला इतक्या जागा मिळणार; योगेंद्र यादवांनी मांडलं सगळं गणित
तर आरोपीचे वकील ॲड प्रशांत पाटील यांनी न्यायालयात सांगितले की, अपघात घडल्यानंतर तक्रारदार गंगाराम स्वतःहून अग्रवाल यांच्या घरी गेला होता. कारण आपल्या जीवाला धोका आहे या भीतीने तो स्वतःहून एक दिवस तिथेच थांबला होता, असा युक्तिवाद न्यायालयात केला होता. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर सुरेंद्र अग्रवालला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT