Sheela Shekhawat : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi)यांच्या हत्येविरोधात जयपूरमध्ये सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. सुखदेव यांची पत्नी शीला शेखावत (Sheela Shekhawat) यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, या हत्येतील आरोपींना 72 तासांच्या आत अटक करणार असल्याचे अश्वासन पोलिसांनी दिले आहे. त्याचबरोबर शीला यांनी सांगितले की, कोल्ह्याने वाघाची शिकार केली आहे. यामध्ये वाघाचा बळी गेल्याने समाज आता जागृत झाला आहे. त्यामुळे सुखदेव गोगामेडी यांचे हौतात्म्य आम्हा व्यर्थ जाऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
गावागावात श्रद्धांजली
कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर सुखदेव यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून पार्थिव जयपूरमधील राजपूत भवनात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सुखदेव सिंह यांच्या अंतिम दर्शनाचा कार्यक्रम सुमारे 2 तास चालणार आहे. त्यानंतर त्यांना रस्त्याने त्यांच्या मूळ गावी गोगामेडी येथे घेऊन जाण्यात येणार आहे. त्यांच्या मूळगावी मृतदेह घेऊन जाताना त्यांना वाटेत ठिकठिकाणी लोकं श्रद्धांजली वाहणार आहेत.
वाघीण अजून जिवंत
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार शीला यांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की, सध्या पोलिसांनी 72 तासांच्या आता सुखदेव यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. पण जर तुमच्या बहिणीला म्हणजे मला तुमची गरज असेल तर तुम्ही मला आधार देण्यासाठी माझ्या पाठीशी उभा राहणार का असा सवालही त्यांनी कार्यकर्त्यांना केला आहे. यावेळी शीला यांनी सगळ्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना म्हणाल्या की, त्यांनी आमच्या वाघाला फसवून मारलं आहे, पण त्यांच्या लक्षात नाही की, मीही वाघीण अजून जिवंत आहे, त्यामुळे मी या सगळ्यांना बघून घेणार अशी तंबीच त्यांनी त्यांच्या विरोधकांना दिली आहे.
हे ही वाचा >> Nalasopara Crime : ‘शेंबड्या’ म्हणत चिडवलं, 8 वर्षाच्या मुलीचा ‘त्याने’ जीवच घेतला
रामलीला मैदानावरही श्रद्धांजली
पोलिसांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर शीला शेखावत यांनी सांगितले की, पोलिसांनी दिलेला शब्द हा तुमच्या संघर्षाचे फळ आहे. तुमच्यामुळेच आम्हाला उच्च अधिकार्यांनी हेही सांगितले की, श्यामनगर पोलीस स्थानकाचे एक अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. सुखदेव यांना त्यांच्या मूळगावी आणि त्यानंतर 10 डिसेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावरही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
गोदाराने दिली होती धमकी
पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कुटुंबाच्यावतीने स्थानिक आमदार आणि सर्व समाजातील नेत्यांची बैठक घेऊन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सांगण्यात आले की, मार्च महिन्यामध्येच सुखदेव यांनी पोलिसांकडे स्वत:साठी संरक्षण मागितले होते. मात्र पोलिसांकडून त्यांना कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही. पोलिसांनी सुरक्षा दिली नसल्यामुळेच त्यांनी स्वतः अंगरक्षक नेमले होते.
दीड वर्षांपूर्वी गँगस्टर रोहित गोदाराने त्यांना पहिल्यांदा धमकी दिली होती. मात्र त्यांनी ती गांभीर्याने घेतली नव्हती. त्यानंतर जेव्हा सिद्धू मूसवालाची हत्या करण्यात आल्या, तेव्हा लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्या हत्येची जबाबदारी घेतली होती. त्यावेळी सुखदेव यांनी मार्च महिन्यामध्येच आपल्याला धमकी मिळाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यावेळी लॉरेन्सचा मुलगा रोहित गोदारा त्यांना धमकी देत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती.
बिश्नोई टोळीनं जबाबदारी स्वीकारली
करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक रोहित गोदाराने थेट या हत्येची त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर आरोपी रोहित राठोड आणि नितीन फौजी फरार आहेत. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी आता पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली आहे. रोहित राठोड हा राजस्थानमधील अलवरचा रहिवासी आहे. तर नितीन फौजी हा हरियाणातील महेंद्रगडचा रहिवासी आहे. तो सैन्यात शिपाई असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सध्या त्यांची पोस्टिंग राजस्थानमधील अलवर येथे झाले असून 8 नोव्हेंबर रोजी ते दोन दिवसांची सुट्टी घेऊन घरी आले होते. मात्र त्यानंतर ड्युटीवर रुजू झाले नाहीत. रोहित राठोड आणि नितीन फौजी हे दोघंही लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नेमबाज असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारीत माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख
दुसरीकडे सुखदेव हत्येप्रकरणी राजस्थान पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. राजस्थान पोलिसांनी बुधवारी स्टेशन हाऊस ऑफिसर मनीष गुप्ता आणि कॉन्स्टेबल महेश यांना निलंबित केले. याप्रकरणी पोलिसांनी UAPA अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि डीजीपी यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. सुरक्षा पुरवण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये दावा करण्यात आला आहे की, राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पोलीस महासंचालक (डीजीपी) यांना पत्रे लिहून गोगामेडी यांना सुरक्षेची मागणी करत 24 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 25 मार्च रोजी तीन वेळा सुरक्षेची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांना जाणीवपूर्वक सुरक्षा पुरवण्यात आली नाही.ट
ADVERTISEMENT