अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खानला (KRK) अटक करण्यात आली आहे. केआरके याला मुंबईतील मालाड पोलिसांनी अटक केली. मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षांपूर्वीच्या ट्विट प्रकरणी पोलिसांनी विमानतळावर अटकेची कारवाई केली.
ADVERTISEMENT
अभिनेता कमाल आर खान याने दोन वर्षांपूर्वी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटवर आक्षेप घेत मालाड पोलीस ठाण्यात केआरके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या ट्विट प्रकरणी आज अटक करण्यात आली आहे.
केआरके (KRK) ला अटक का करण्यात आलीये?
कमाल आर खानला २०२० मध्ये केलेल्या ट्विट प्रकरणात अटक करण्यात आलीये. कमाल आर खानने २०२० मध्ये अभिनेता इरफान खान आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. कमाल आर खानच्या दोन्ही ट्विटवर राहुल कनाल यांनी आक्षेप घेतला होता आणि तक्रार दिली होती. मालाड पोलिसांनी कमाल आर खानला विमानतळावर ताब्यात घेतलं होतं. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी केआरकेला अटक केली.
कमाल आर खान यांच्याविरुद्ध २०२० मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. केआरकेवर आरोप आहे की त्याने सोशल मीडियावर धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट केलं. केआरके विरुद्ध युवा सेनेचे सदस्य राहुल कनाल यांनी तक्रार दिली होती.
केआरकेच्या अटकेनंतर राहुल कनाल काय म्हणाले?
मुंबईत मालाड पोलिसांनी अभिनेता केआरकेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर अटक केली. त्याला आज बोरिवली सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.
कमाल आर खानला अटक करण्यात आल्यानतंर तक्रारदार राहुल कनाल म्हणाले, “माझ्या तक्रारीनंतर कमाल आर खानला आज अटक करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईचं मी स्वागत करतो. केआरके सोशल मीडियावर आपत्तीजनक टीका-टिप्पणी करत असतो आणि असभ्य भाषेचा वापर करतो. अशा प्रकारचं वर्तन समाजात स्वीकारलं जाऊ शकत नाही. केआरकेला अटक करून मुंबई पोलिसांनी अशा लोकांना कडक इशारा दिला आहे.”
सलमान खानने केआरके विरोधात दाखल केला होता बदनामीचा खटला
वादग्रस्त ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची कमाल आर खानची ही पहिलीच वेळ नाहीये. आतापर्यंत अनेक ट्विट्समुळे तो यापूर्वीही चर्चेत आलाय आणि अडचणीत सापडलेला आहे. केआरके नेहमीच बॉलिवूड कलाकारांना टीका करत असतो. सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत तो बॉलिवूड सेलिब्रेटींबद्दल बंर-वाईट बोलत असतो.
अभिनेता सलमान खाननंही कमाल आर खानवर बदनामी केल्याचा खटला भरला होता. राधे चित्रपटाचं नकारात्मक समीक्षा करण्याबरोबरच केआरकेने सलमान खानवर वैयक्तिक टीका केली होती. अभिनेता मनोज वाजपेयीनेही केआरके विरोधात कारवाई केली होती.
कमाल आर खानने अनेक हिंदी, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तो चित्रपट निर्माताही आहे. २००५ मध्ये सितम चित्रपटापासून त्याने निर्माता म्हणून सुरूवात केली होती. कमी बजेटमधील अनेक भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांत त्याने काम केलेलं आहे.
ADVERTISEMENT