अच्युत पोतदार ठरले झी मराठी अवॉर्ड २०२०-२१ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी

मुंबई तक

• 12:45 PM • 24 Mar 2021

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अॅवॉर्ड्स’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.यंदाच्या ‘झी मराठी अवॉर्ड २०२०-२१’ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले ‘श्री. अच्युत पोतदार’ अर्थशास्त्राचे गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक, भारतीय सैन्य दलात दाखल होऊन भारत-पाकिस्तान युध्दात आपल्यावर सोपवलेली कामगिरी फत्ते करणारे कर्तव्यदक्ष कॅप्टन ते इंडियन ऑईलमध्ये […]

Mumbaitak
follow google news

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अॅवॉर्ड्स’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.यंदाच्या ‘झी मराठी अवॉर्ड २०२०-२१’ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले ‘श्री. अच्युत पोतदार’ अर्थशास्त्राचे गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक, भारतीय सैन्य दलात दाखल होऊन भारत-पाकिस्तान युध्दात आपल्यावर सोपवलेली कामगिरी फत्ते करणारे कर्तव्यदक्ष कॅप्टन ते इंडियन ऑईलमध्ये अधिकारी पद या भूमिका चोख पार पाडून अभिनय क्षेत्रात स्वतःला आजमावून पाहणं, ही वाट अतिशय खडतर होती. परंतु अच्युत पोतदार यांचं व्यक्तिमत्त्वच मुळात हसतमुख, शिस्तप्रिय, धीट आणि आपण घेतलेल्या निर्णयावर ते ठाम असल्यामुळे ती खडतर वाटही फुलांची झाली.

हे वाचलं का?

एक आजोबा, चार मामा आणि त्यांचा लाडोबा असलेल्या गोड भाचाच्या प्रेमाची गोष्ट जेव्हा ‘माझा होशील ना’ या मालिकेतून मांडण्याचा असाच वेगळा प्रयोग करायचे ठरले तेव्हा शिस्तप्रिय, प्रसंगी हळव्या आजोबांच्या व्यक्तिरेखेसाठी योग्य कलाकाराची निवड करणे, हे आव्हान होते. परंतु आजोबांची ही व्यक्तिरेखा शब्दांतून साकार झाली तेव्हा नजरेसमोर फक्त एकच नाव होते ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते ‘अच्युत पोतदार’.‘विनायक ब्रम्हे’ म्हणजेच अप्पा ही लडीवाळ आजोबांची अच्युत पोतदार यांनी साकारलेली व्यक्तिरेखा म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक घरासाठी जणू मायेची सावली झाली आहे.जगभर सध्या कोरोनाच्या साथीने थैमान घातल्यामुळे समाजातील सर्व स्तरांप्रमाणेच ज्येष्ठ कलाकारांनाही चित्रिकरण करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अशा कठीण प्रसंगातही आपल्या घरून चित्रिकरण करत अच्युत पोतदार यांनी व्यावसायिक निष्ठेला प्राधान्य दिलं. त्यांच्या या अतुलनीय धैर्याला सलाम.

“हम यहा आपकी सेवा करने के लिए ही तो बैठे है,” असं म्हणत श्रीनिवास वागळे यांचं लायसन्स देणारा ‘वागळे की दुनिया’ मालिकेतला ऑफिसर अनेकांना आठवत असेल. अभिनेता आमीर खानला मशीनची पुस्तकी व्याख्या विचारणारा प्राध्यापक आणि त्याचं ते… “कहना क्या चाहते हो” हे ‘थ्री इडियट्स’ मधील वाक्य सहज प्रेक्षकांच्या ओठी येतं. ‘माझा होशील ना’ मालिकेतल्या प्रेमळ संवादांबरोबरच हातातला सोटा वर उचलून, हाणू का सोटा? असं म्हणणारे अप्पा सर्वांचे लाडके आजोबा झाले आहेत.‘माझा होशील ना’ मालिकेच्या सेटवर सर्वात तरूण मी आहे, असं ते मिश्किलपणे म्हणतात. पण त्याचा खरा अर्थ मात्र कितीही संकटं आली तरी तरून जातो तो ‘तरूण’ असाच आहे. आणि हे अच्युत पोतदार यांनी सिद्ध केलंय.

    follow whatsapp